कोरोना काळातही मंत्रालयात बदल्यांच्या बाजार सुरु?
1 मार्च ते 31 मे हा मंत्रालयात नियमित बदल्यांचा काळ असतो. पण कोरोनामुळे यंदा बदल्यांना ब्रेक लागला होता. तरी सरकारने 15 टक्के नियमित बदल्यांसाठी आदेश काढून 31 जुलै पर्यंत बदल्यांसाठी मुदतवाढ दिली.
मुंबई : कोरोनामुळे शुकशुकाट असलेल्या मंत्रालयात मागच्या आठडव्यात अचानक वर्दळ वाढलेली दिसली. अनेक अधिकरी - कर्मचारी मंत्र्यांच्या दालनाबाहेर खेटे घालतांना दिसत होते. पण ही गर्दी सरकारच्या पुनश्च हरिओम या घोषणेमुळे नाही तर बदल्यांच्या मोसमामुळे असल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.
1 मार्च ते 31 मे हा मंत्रालयात नियमित बदल्यांचा काळ असतो. पण कोरोनामुळे यंदा बदल्यांना ब्रेक लागला होता. तरी सरकारने 15 टक्के नियमित बदल्यांसाठी आदेश काढून 31 जुलै पर्यंत बदल्यांसाठी मुदतवाढ दिली. यामुळे कोरोनाकाळातही शुकशुकाट असलेल्या मंत्रालयात इच्छुकांनी लॉबिंगसाठी चांगलीच गर्दी केली होती.
मलाईदार पदांवर बदलीसाठी नेहमी उन्हाळ्यात मंत्रालयातील वातावरण तापलेलं असतं. आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या निकटवर्तीयांशी 'अर्थ'पूर्ण संबंधांमुळे हवी ती नियुक्ती पदरात पाडून घेता येते. मात्र यंदा कोरोनाच्या काळातही मंत्रालयात बदल्यांचा मोसम चांगलाच उबदार असल्याची चर्चा आहे.
मात्र आता या 'भेटीगाठी संस्कृतीवर' आक्षेप घेत त्याला आळा घालण्याची मागणी थेट अधिकरी - कर्मचारी संघटनांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलं आहे. महसूल, गृह, पीडब्ल्यूडी, शहर विकास, एक्साईज, सहकार, कृषी या खात्यातील बदल्यांची मोठी चलती असते. मात्र कोरोनाच्या काळात बदल्यांना विलंब झाला असला तरी बदल्यांच्या तरतुदींचे पालन व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचा काळात जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर काही मोजक्या कोटींच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्यांमुळे अन्याय होणार नाही याची दक्षता आता राज्याच्या प्रमुखांनी घ्यायची आहे.