बजेट नसल्यानं जीआरपीला होमगार्डची साथ लांबणीवर; सुरक्षेसाठी पुरेसं संख्याबळ नाही, मुंबई लोकलची सुरक्षा ऐरणीवर?
भारतीय तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांचा लोकलमध्ये घातपाताचा मोठा कट उध्वस्त केला आहे. त्यांनीच भारतातील मोठी रेल्वे स्थानकं, रेल्वे पूल त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं आहे.
मुंबई : मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मुंबईतली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मात्र लोहमार्ग पोलिसांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं आणि अतिरिक्त होमगार्ड राज्य सरकारकडून मिळत नसल्यानं सुरक्षा कशी पुरवली जाईल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भारतीय तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांचा मुंबई लोकलमध्ये घातपात करण्याचा खूप मोठा कट उध्वस्त करण्यात आला आहे. जे दहशतवादी पकडण्यात आले आहेत, त्यांनीच भारतातील मोठी रेल्वे स्थानकं आणि रेल्वे पूल त्यांच्या निशाण्यावर असल्याचं पोलीस चौकशीदरम्यान सांगितलं आहे. मात्र वेळीच तपास यंत्रणांनी त्यांना पकडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पण रेल्वे सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले लोहमार्ग पोलीस पुरेसे आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी होमगार्डचे अतिरिक्त जवान पुरवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र बजेट नसल्यानं ही अतिरिक्त कुमक पुरावलीच गेली नाहीये, अशी माहिती लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त यांनी दिली आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या या मागणीकडे राज्य शासनानं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. कारण लोकलमधली प्रवासी संख्या आता हळूहळू का होईना पण वाढत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लोहमार्ग पोलिसांची कुमक या वाढणाऱ्या संख्येसाठी पुरेशी नाही, हे आकडेवारीतून देखील सिद्ध होत आहे.
मुंबईतील मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सध्या रेल्वे प्रशासनाचं रेल्वे सुरक्षा बल आणि राज्य सरकारचं लोहमार्ग पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान देखील असतात. रेल्वे सुरक्षा बलाची आकडेवारी पाहिली तर पश्चिम रेल्वेवर 1535 आणि मध्य रेल्वेवर 1957 आरपीएफ अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत.
दुसरीकडे दोन्ही रेल्वेमार्गांवर मिळून 3123 लोहमार्ग पोलीस सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला 150 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान देखील आहेत. म्हणजेच, एकूण 6765 सुरक्षा कर्मी, मुंबई आणि आसपासच्या लोकल प्रवाशांसाठी सध्या कार्यरत आहेत.
दरम्यान, ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल ही प्रवाशांची संख्या पाहता सुरक्षा यंत्रणांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे निश्चितच अतिरिक्त कुमक रेल्वे सुरक्षेसाठी देणं अत्यंत गरजेचे आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या निर्बंध असूनही 37 ते 38 लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत, त्यात रोज हजारो प्रवाशांची भर पडते आहे, अशात दहशतवादी कट उद्धवस्त झाल्यानं राज्य सरकार अतिरिक्त कुमक का देत नाही? असा प्रश्न निर्माण झालाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्यानंतर मुंबई 'हायअलर्ट'वर; मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारणार
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी
- Terrorist Arrested : देशात घातपाताचा कट, 6 दहशतवादी अटकेत; मुंबईत राहणारा दहशतवादी नेमका कोण?
- Terrorist Arrested : भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक, दोघांचं पाकिस्तानात ट्रेनिंग