एमएमआरडीए अन् वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात ऐतिहासिक करार; महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
शाश्वत विकास आणि नवप्रवर्तनाच्या वाटचालीचा आरखडा तयार
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आणि महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से.यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत (डब्ल्यूईएफ) सामंजस्य करार (एमओसी) केला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत असा करार करणारी एमएमआरडीए ही पहिली पॅरास्टेटल संस्था ठरली आहे.
महाराष्ट्र ही 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने ही भागीदारी हे एक धाडसी पाऊल आहे आणि या निमित्ताने शहरी विकासाचा जागतिक मापदंड प्रस्थापित करण्यासाठी ही भागादारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष प्रा. क्लाॅस श्वाब तब्बल 45 वर्षांनंतर महाराष्ट्र भेटीवर आले होते. या भेटीत त्यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारात मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) शाश्वत शहरी आणि पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये निरंतर संवाद आणि सहकार्यासाठी एक ठोस आराखडा तयार होणार आहे.
सहकार्य करारातील प्रमुख मुद्दे-
1. आर्थिक विकासाला गती देणे:
सध्या भारताच्या जीडीपीमध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा 140 अब्ज डॉलर्सचा वाटा आहे, आणि 2030 पर्यंत हा आकडा 300 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. मोठ्या प्रमाणातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यातील एमएमआरडीएच्या नेतृत्वाचा एमएमआरडीए आणि डब्ल्यूईएफमधील या सहकार्यामध्ये लाभ घेता येणार आहे.
2. जागतिक पातळीवरील तज्ज्ञ आणि नवप्रवर्तन:
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे 130 शहरांमधील विस्तृत जाळे आणि 185 व्यावसायिक भागीदार एमएमआरडीएला वातावरणबदलाशी सुसंगत, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी अत्याधुनिक उपाययोजना प्रदान करतील. या सहकार्यामुळे मुंबई महानगर प्रदेश हा वाणिज्य, गुंतवणूक आणि राहणीमानासाठी जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित होण्यास मदत होईल. तसेच सामाजिक, डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांमध्ये नवप्रवर्तनाला चालना मिळेल.
3. राहणीमान आणि शाश्वततेत वाढ:
हा सहकार्य करार महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या वाटचालीशी सुसंगत आहे आणि 2047 पर्यंत जवळपास शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी हवामान ध्येयांना या करारात समर्थन देण्यात आले आहे. सार्वजनिक परिवहन, परवडणारी घरे, लॉजिस्टिक्स, हरित पायाभूत सुविधा आणि एआय गुंतवणूक यावर या करारात प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
4. रोजगार निर्मिती:
या सहकार्यामुळे तंत्रज्ञान, वित्त, आरोग्य, शिक्षण आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये लाखो रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई महानगर प्रदेशात शाश्वत शहरी विकासाला चालना देणे-
या सहकार्याद्वारे एमएमआरडीए "ब्रँड एमएमआर" जागतिक स्तरावर प्रस्थापित करेल. त्यामुळे गुणवंत व्यक्ती, गुंतवणुकीला आकर्षित करण्यात येईल आणि व्यावसायिक संधी निर्माण होतील. या भागीदारीमुळे वित्त, तंत्रज्ञान, आरोग्य, लॉजिस्टिक्स, शिक्षण आणि मनोरंजन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हाय-एंड (कौशल्यपूर्ण) लाखो रोजगार निर्माण होतील. याशिवाय, या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल, कारण रिअल इस्टेट, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांचा विकास होईल. परिणामी, हा प्रदेश शाश्वत, सर्वसमावेशक आणि आव्हानांना सामोरे जात आणि त्यावर मात करून केल्या जाणाऱ्या शहरी विकासामध्ये अग्रस्थानी जाईल.
महाराष्ट्र हे जागतिक व्यवसाय केंद्र म्हणून परिवर्तित करणे-
या सहकार्य करारामुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायांमधील सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना मिळेल. यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल. स्टार्टअप्स, फिनटेक क्षेत्र आणि शाश्वत पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला असून या भागीदारीमुळे वित्त आणि सेवा क्षेत्रांमध्ये जगभरातील गुणवान व्यक्ती आणि गुंतवणूक एमएमआरमध्ये आकर्षित होईल. निती आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी,भा.प्र.से. त्यांच्याशी समन्वय साधत आहेत. सध्या या प्रदेशात रु.३ लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. या सामंजस्य करारामुळे या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल, आर्थिक सर्वसमावेशकता वाढेल आणि जागतिक स्तरावरील परिषदा, प्रदर्शने आणि व्यापार कार्यक्रमांसाठी मोठ्या संधी निर्माण होतील. या सगळ्याची परिणती म्हणजे, व्यवसाय, नवप्रवर्तन आणि शाश्वततेमध्ये महाराष्ट्राचे असलेले आघाडीचे स्थान अधिक बळकट होईल.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लाॅस श्वाब काय म्हणाले?
"एमएमआरडीएसोबत हा सामंजस्य करार झाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. या भागीदारीमुळे या प्रदेशाच्या विकास योजनेत एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय आयाम जोडला गेला आहे. भविष्यात मुंबई हे शहर सिंगापूर, लंडन आणि न्यूयॉर्क यांसारख्या जगातील सात-आठ प्रमुख शहरांप्रमाणे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येईल, अशी मला अपेक्षा आहे. सशक्त अंमलबजावणीच्या माध्यमातून मुंबई हा अद्वितीय बदल नक्की साध्य करेल, अशी मला खात्री आहे."