एक्स्प्लोर
रत्न घालूनही कोट्यधीश नाही, ज्योतिषाला ग्राहक मंचाचा दणका
मुंबईतील प्रभादेवी भागात राहणारे खंडाळे 11 फेब्रुवारी 2013 रोजी या ज्योतिषाच्या दादर पूर्वेच्या शाखेत गेले. नीलम रत्नाची खरेदी त्यांनी केली. काही दिवसांनी दुकानातील दोघांचा खंडाळेंना फोन आला. नीलम तुमच्यासाठी भाग्यशाली नसून त्याऐवजी पुष्कराज आणि माणिक रत्न विकत घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

मुंबई : 'आमचे नवग्रहाचे रत्न घाला आणि कोट्यधीश व्हा' अशा जाहिरातीतून भुलवणाऱ्या भामट्या ज्योतिषांना ग्राहक मंचाने दणका दिला आहे. 80 वर्षीय इसमाचं भविष्य पालटण्यात 'रत्नं' अयशस्वी ठरल्यामुळे ग्राहक मंचाने 3 लाख 20 हजारांची रक्कम परत देण्याचे आदेश ज्योतिषाला दिले आहेत.
'मिड-डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. आमचे नवग्रहांचे रत्न घातल्यास भाग्योदय होत असल्याचा दावा करणाऱ्या मुंबईतील एका प्रसिद्ध ज्वेलर्सची जाहिरात कवादू खंडाळे यांनी 2013 मध्ये पाहिली होती. तीन महिन्यांत फरक न जाणवल्यास 100 टक्के रक्कम परत करण्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला होता.
मुंबईतील प्रभादेवी भागात राहणारे खंडाळे 11 फेब्रुवारी 2013 रोजी या ज्योतिषाच्या दादर पूर्वेच्या शाखेत गेले. नीलम रत्नाची खरेदी त्यांनी केली. काही दिवसांनी दुकानातील दोघांचा खंडाळेंना फोन आला. नीलम तुमच्यासाठी भाग्यशाली नसून त्याऐवजी पुष्कराज आणि माणिक रत्न विकत घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यासाठी खंडाळे यांनी 2 लाख 90 हजार रुपये भरले.
तीन महिन्यात कोट्यधीश न झाल्यास पैसे परत करण्याचं आश्वासन ज्योतिषांनी दिलं. मात्र या कालावधीत काहीच न घडल्यामुळे खंडाळे यांनी दुकान गाठलं आणि आपले पैसे परत मागितले. मात्र ज्योतिषांनी नकार दिल्यामुळे खंडाळेंनी मे 2014 मध्ये ग्राहक कोर्टात धाव घेतली.
संबंधित दुकानाला नोटीस पाठवल्यानंतर कंपनीने आपल्यावरील आरोप फेटाळले. खंडाळे यांना सल्ला दिल्यानंतर त्यांनी कोणाच्याही दडपण किंवा बळजबरी शिवाय नीलम रत्न विकत घेतलं. मात्र ते सूट होत नसल्याचं सांगत त्यांनी पुष्कराज आणि माणिक खरेदी केलं. मात्र अटी आणि नियमांनुसार 30 दिवसांच्या
आत रत्न परत करणं आवश्यक आहे. त्यांनी तसं न केल्यामुळे रक्कम परत देऊ शकत नाही, असं उत्तर कंपनीने
दिलं.
ग्राहक कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कंपनीने फसवणूक केल्याचा निकाल दिला. 2 लाख 90 हजार रुपयांच्या पूर्ण रकमेसह 9 टक्के व्याज, 25 हजारांची नुकसान भरपाई आणि 5 हजार रुपये कोर्टाचा खर्च देण्याचे आदेश दिले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
कोल्हापूर
कोल्हापूर























