Ganeshotsav 2023 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी चांगली बातमी; अमानत रक्कमेत मोठी कपात, मूर्तीकारांनाही दिलासा
Ganeshotsav 2023 : मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत सार्वजनिक गणेश मंडळ, मूर्तीकार संघटना, विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील गणेशोत्सवासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी, 1 ऑगस्ट रोजी आढावा बैठक पार पडली. सार्वजनिक गणेश मंडळांना अर्जासोबत भरावे लागणारे एक हजार रुपयांचे अनामत कमी करावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले होते. त्यानुसार आता ही रक्कम फक्त 100 रुपये करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विविध स्तरावर पूर्वतयारी सुरू आहे. यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी 308 कृत्रिम तलाव, 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था आहे. यंदा महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता, वृक्षछाटणी आदी कामेही सुरू आहेत. निर्माल्य कलशाची व्यवस्था, वैद्यकीय चमू, विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमूणक आदी बाबीही निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिका उप आयुक्त (परिमंडळ-2) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी या वेळी दिली.
मूर्तीकारांना दिलासा
पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तीकारांना देण्यासाठी 205 मेट्रीक टन शाडूची माती उपलब्ध करण्यात आली आहे. मूर्तीकारांना मूर्ती घडवण्यासाठी 45 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान पाच ते 10 मूर्तीकार काम करू शकतात. मूर्तीकारांच्या मागणीनुसार अधिक माती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गणेशोत्सवास मंडळांसाठी एक खिडकी योजना
मु्ंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून (single window system) ऑनलाईन अर्जाची (Online Application) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी 1 ऑगस्ट 2023 पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.
असा करा ऑनलाईन अर्ज
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर एक ऑगस्टपासून 13 सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.