मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
Datta Dalvi: फेरीवाल्यांनी दत्ता दळवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
Datta Dalvi मुंबई: मुंबईत फेरीवाल्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. आता हे फेरीवाले नेतेमंडळीनाही जुमानत नसून या नेतेमंडळींना देखील फेरीवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. विक्रोळीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत फेरीवाल्यांनी धकाबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विक्रोळीतील मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळ असलेल्या काही फेरीवाल्यांनी रस्त्यावर जागा अडवून धंदे लावले होते. त्यामुळे रस्त्यात अडचण होत असल्यामुळे माजी महापौर दत्ता दळवी यांनी तिथले प्लास्टिकचे क्रेट बाजूला केले. यामुळे फेरीवाल्यांनी दत्ता दळवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणाचा संपूर्ण सीसीटिव्ही फुटेज देखील आता समोर आला आहे.
सदर घटनेनंतर दत्ता दळवी काय म्हणाले?
सदर घटनेनंतर दत्ता दळवी म्हणाले की, मी याच भागात 10 वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु एकाही फेरीवाल्याची हिंमत नव्हती रस्त्यावरती बसायची. 42 फुटाचे रस्ते आहेत, 42 ते 45 फुटाचे रस्ते आहेत. पण आज लोकांना 10 फुटाचे सुद्धा चालायला मिळत नाहीयत. आणि मी सातत्यानेच्या मागे असतो, बाबा तुमच्या जागेवर तुम्ही बसा, लोकांचा तुम्ही अधिकार तुम्ही हिसावून घेऊ नका. त्यादिवशी सकाळी मी त्या दुकानाच्यासमोर गेलो. रस्त्यावरती भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं होतं आणि ते भाजीचे क्रेट हटवल्यानंतर तो विक्रेता माझ्या अंगावर धावून आला. लोकांना त्रास होतोय आणि त्याविरोधामध्ये मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मी यावेळी एकटा होतो आणि फेरीवाल्याना त्या पुरून उरेन एवढी ताकत सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु ज्यांच हे काम आहे त्यांनी करणं आवश्यक आहे, असं दत्ता दळवी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले.
कोण आहेत दत्ता दळवी? (Who Is Datta Dalvi)
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच 2005 ते 2007 या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. सन 2018 साली दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेवर दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली.