स्वतःला वाचवण्यासाठी खोटे आरोप, परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लोकमत आणि एबीपी माझाच्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, "परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या." याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे.
अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरण हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून स्पष्ट होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.
परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021