(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिंवडीत तोतया पोलिसाला अटक, रिक्षाचालकांवर कारवाई करुन उकळायचा पैसे
एका रिक्षा चालकावर कारवाई करत असताना या तोतया वाहतूक पोलिसाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. अल्पेश शंकर निवडे (वय 23) असं या तोतया वाहतूक पोलिसांचे नाव आहे.
भिंवंडी : भिंवडीत एका तोतया पोलिसाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. हा तोतया पोलिस रिक्षाचालकांवर बनावट कारवाई करत पैसे उकळण्याचा धंडा करत होता. रिक्षाचालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्र येत या तोतया पोलिसाला चांगलाच धडा शिकवत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत अनेक ठिकाणी पोलिसांची दंडात्मक कारवाई सुरू आहे. याचाच फायदा घेत एक तोतया वाहतूक पोलीस देखील भिवंडी शहरातील अंजुर फाटा ते धामणकर नाका या परिसरात रिक्षाचालकांवर कारवाई करत होता. रिक्षाचालकांकडून लायसन्स, कागदपत्रे मागणे फोटो काढून त्यांना घाबरवायचा व त्यांच्याकडून दंड वसुली करत होता. परंतु काही रिक्षाचालकांकडे लायसेन्स कागदपत्र तसेच सर्वच गोष्टी असूनही त्यांच्यावर कारवाही होत असल्याने याची तक्रार वाहतूक पोलिसात करण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की अशा प्रकारचा कोणताही पोलिस त्याठिकाणी नेमण्यात आलेला नाही. तेव्हा रिक्षाचालकांनी एकत्रित येऊन या तोतया वाहतूक पोलिसाला पकडण्याचे ठरवलं. एका रिक्षा चालकावर कारवाई करत असताना या तोतया वाहतूक पोलिसाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. अल्पेश शंकर निवडे (वय 23) असं या तोतया वाहतूक पोलिसांचे नाव आहे.
शंकर भिवंडी शहरात शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तसेच वाहतूक पोलिसांचा होमगार्ड म्हणून याआधी काम पाहत होता. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा होमगार्डचा देखील काम करत नव्हता. परंतु त्याने स्वतःला वाहतूक पोलीस म्हणून भिवंडी अंजुरफाटा ते धामणकर नाका या परिसरात रिक्षाचालकांवर पोलीस म्हणून कारवाई सुरु केली होती. अनेक रिक्षाचालकांना त्यांने लुबाडले असल्याने याचा मोठा त्रास या परिसरात रिक्षाचालकांना झाला होता. त्या विरोधात रिक्षाचालकांनी तक्रार देखील केल्या. परंतु असे कोणतेही पोलीस त्याठिकाणी नेमण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याने रिक्षाचालकांनी या तोतया पोलिसाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. सध्या या तोतया पोलिसाला पकडून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास सध्या भिवंडी शहर पोलीस करत आहेत.