Mumbai Police: मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव
Saurabh Tripathi: अंगाडियाकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
Saurabh Tripathi: अंगाडियाकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती. त्यांच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी बेपत्ता आहेत.
त्रिपाठी फरार म्हणून घोषित
दरम्यान या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले. त्यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतरपासूनच सौरभ त्रिपाठी बेपत्ता आहेत. त्यांना गुन्हे शाखेने 16 मार्च रोजी फरार म्हणून घोषित केले आहे.
काय आहेत आरोप?
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंगडिया असोसिएशनने गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. ज्यात त्यांनी आरोप केला होता की, डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा 10 लाख रुपयाची लाच देण्याची मागणी केली होती.
त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू
मुंबई पोलिसांनी त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला आहे. पोलिसांनी आपल्या प्रस्तावात आरोप केला आहे की, त्रिपाठी आपल्यावरील खंडणीच्या आरोपांच्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित अंगडिया व्यापाऱ्यांना तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्रिपाठी आणि अंगडिया व्यापाऱ्यामधील संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही मुंबई पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे कॉल रेकॉर्डिंग स्वत: अंगडिया व्यापाऱ्याने (तक्रारदार) मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण
- ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार
- Russia Ukraine War : रशियन सैनिकांकडून वयोवृद्ध महिलांवर अत्याचार नंतर फाशी : युक्रेनच्या खासदाराचा गंभीर आरोप