इंजिनिअर जोडप्यानं अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ!
बदलापूर येथील एका इंजिनिअर जोडप्यानं अनाथाश्रमात लग्नगाठ बांधली. या जोडप्याने लग्नाचा खर्च टाळून सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली. लग्नात मोजके वऱ्हाडी अन् सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं.
बदलापूर : लग्न म्हटलं की थाटामाटात होणारा समारंभ, हौसमौज, मोठा खर्च, जेवणावळी, अशा खूप गोष्टी येतात. मात्र, या सगळ्याला फाटा देत बदलापूरच्या एका जोडप्यानं अनाथाश्रमात आपली लग्नगाठ बांधली. कोरोना विषाणूच्या या कठीण परिस्थितीत लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात या जोडप्याने घेतलेला निर्णय समाजासाठी नक्कीच आदर्श घेण्यासारखा आहे.
उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही इंजिनिअर आहेत. खासगी कंपनीत काम करणारे आणि सुखवस्तू कुटुंबातले. या दोघांचं एप्रिल महिन्यात लग्न ठरलं. पण लॉकडाऊनमुळे ते मे महिन्यात ढकललं गेलं. मे महिन्यातही लॉकडाऊन असल्यानं हे लग्न 14 जून रोजी करण्याचं ठरलं. स्वप्नील आणि प्राची दोघेही आपापल्या आईवडिलांना एकुलते एक. त्यामुळे लग्न धुमधडाक्यात होणार हे ठरलेलं. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमतानं हे लग्न एखाद्या अनाथाश्रमात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाजपचे नेते संभाजी शिंदे यांनी बदलापूरच्या सत्कर्म बालकाश्रमात लग्नाची व्यवस्था केली.
Lockdown | लॉकडाऊनमध्ये नवीन लग्न सांभाळताना...
यामागचा मूळ विचार होता तो म्हणजे लग्नाचा खर्च वाचवून त्यातून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत वऱ्हाडी मंडळींना फेसशिल्ड, मास्क देण्यात आले. अतिशय छोटेखानी पद्धतीने हा लग्नसोहळा आज सत्कर्म बालकाश्रमात पार पडला. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेतून हा निर्णय घेतल्याचं दोन्ही कुटुंबीयांनी सांगितलं आहे. तर नववधू आणि वरानेही यापुढे सर्वांनी आमचं अनुकरण करण्याचा संदेश दिला. या लग्नाचं सध्या कौतुक होतंय.
लॉकडाऊनच्या काळात घरगुती लग्न लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आहेत. यावर उपाय काढत अनेकांनी आता साध्या पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे ठरवले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा खर्च कमी होत आहे. शिवाय कोरोना विषाणू संसर्ग काळात हा निर्णय उत्तम ठरत आहे.
कोविड योद्धा डॉ.संदिप आणि डॉ.हिमांगी लग्नाच्या बेडीत, नवदाम्पत्य लवकरच कोविड सेंटरमध्ये रुजू होणार