वसईत भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं तब्बल 80 कोटीचं वीज बिल, चूक लक्षात येताच महावितरणकडून दुरुस्ती
महावितरणने वसईतील भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं वीज बिल तब्बल 80 कोटी रुपये पाठवलं. चूक लक्षात येताच महावितरणने दुरुस्ती करत एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं.

वसई : वसईत एका भात गिरणी मालकाला दोन महिन्याचं वीज बिल तब्बल 80 कोटी रुपये आलं होतं. एवढ्या प्रचंड रक्कमेचं बील हाती येताच गिरणीमालकाला चांगलाच धक्का बसला होता. मात्र महावितरणाने सुधारित बिल गिरणीमालकाला घरपोच देऊन आपली चूक सुधारली आहे. त्याचबरोबर एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं असून मीटर वाचन करणाऱ्या एजन्सीवर तर गुन्हाच दाखल केला आहे.
81 वर्षीय गणपत नाईक यांचं वसईच्या निर्मळ इथे जगमाता ही भाताची गिरणी आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते भात गिरणीचा व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा सतीश याचं दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं. या दुःखातून त्यांचे कुटुंब सावरत नाही तोच, त्यांना एक नवा धक्का बसला आहे. भात गिरणीतील वीज मीटर मुलाच्या नावावर आहे. महावितरणने त्यांना दोन महिन्याचं वीज बिल तब्बल 80 कोटी 13 लाख 89 हजार 600 रुपयांचे पाठवलं. नाईक यांना एका महिन्यासाठी जास्तीत जास्त 50 ते 60 हजार रुपये वीज बिल येतं. मात्र एवढ्या बिलाने ते हादरुनच गेले होते.
यानंतर महावितरणाने मीटर वाचन यंत्रणेत नोंद करताना चूक झाल्याचं मान्य केलं आहे. तर देयक दुरुस्ती झाल्याशिवाय ग्राहकाला वीज बिल देऊ नका अशा सूचनाही एजन्सीला देण्यात आल्या होत्या. तरीही वीज बिल ग्राहकाच्या हातात गेल्याने महावितरणाने संबंधित लिपिकाला निलंबित केलं आहे. तर सहाय्यक लेखापाल आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसंच चुकीचं देयक वितरित केल्याप्रकरणी मीटर वाचन घेणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल केला असल्याचं महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे यांनी सांगितलं आहे. याशिवाय गणपत नाईक यांना सुधारित 86 हजार 890 रुपयाचं वीज बिल घरी जाऊन दिल्याचही सांगितलं.
वसई विरारमधील हजारो ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून अवाजवी वीज देयके येत आहेत. अवाजवी आणि चुकीच्या वीज देयकाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
