(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ED Raid : आर एल ज्वेलर्सवर कारवाई, जळगावसह 13 ठिकाणी छापे; ईडीला काय सापडले?
ED Raids : ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
मुंबई/जळगाव :अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या तीन दिवसात मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्याचा साथीदारांच्या जवळपास 13 ठिकाणांची झडती घेतली. ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय, ईडीला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत.
आजच्या कारवाईत राजमल लखीचंद ग्रुपच्या 60 मालमत्तेचा तपशील आज हाती लागला असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाण्यात 13 ठिकाणी शोधमोहीम राबवली. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी, पुष्पा देवी आणि नीतीका मनीष जैन यांनी केलेल्या कर्जाच्या फसवणुकीसंदर्भात छापे टाकण्यात आले.
ईडीला तपासात काय आढळले?
ईडीच्या तपासात समोर आले की, 3 आरोपी कंपन्यांच्या प्रवर्तकांनी एकत्रितपणे संगनमत करून काल्पनिक व्यवहार केले होते आणि तिन्ही आरोपी कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या हिशोबांच्या पुस्तकांचा बनाव केला होता. ईडीला काही व्यवहारात विसंगती आढळून आल्या आहेत.
मुख्य होल्डिंग कंपनी म्हणजेच राजमल लखीचंद जळगाव भागीदारी फर्मसोबतच्या लेखापुस्तकात बोगस विक्री-खरेदीचे व्यवहार दाखविण्यात आले होते. व्यापारातील मोठ्या प्रमाणात साठा पूर्णपणे गायब असल्याचे आढळून आले. 1284 KG पेक्षा जास्त दागिन्यांच्या घोषित साठ्यावर, ED फक्त 40 KG दागिने शोधू शकले. अशा प्रकारे, अस्तित्वात नसलेल्या दागिन्यांसाठी बोगस खरेदी दाखवून या घोषित स्टॉकवर घेतलेले कर्ज बुडवले गेले.
प्रवर्तक राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, आरोपी कंपन्यांनी कर्जाचा खरा वापर सिद्ध करण्यासाठी कोणतेही आधारभूत कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी झाले. 2003-2014 (कर्ज वितरण कालावधी) या कालावधीसाठी कोणतेही खाते, खातेवही, स्टॉक रजिस्टर, इनव्हॉइस किंवा कोणतेही आधारभूत कागदपत्रे ठेवली गेली नसल्याची बाब समोर आली आहे.
फसवणूक करून नवीन कर्जासाठी अर्ज करण्यासाठी डमी संचालक म्हणून नातेवाईकांसह काल्पनिक संस्था तयार करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
राजमल लखीचंद ग्रुपच्या संबंधितांवर बोगस विक्री खरेदी व्यवहारांच्या गुंतागुंतीच्या व्यवहाराद्वारे कर्जे मार्गी लावली गेली आणि शेवटी प्रवर्तकांनी स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली. आर एल एंटरप्रायझेसच्या नावाने नवीन दागिन्यांचा व्यवसाय आणि रिअल इस्टेट क्षेत्रात नवीन गुंतवणूक, कार डीलरशिप, हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याचे समोर आले.