राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांना ड्रेस कोड बंधनकारक
मुंबई : 'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शर्ट आणि फुल पॅन्ट, अॅप्रन, शूज बंधनकारक असणार आहेत. तर विद्यार्थिंनींना शर्ट, फुल पॅन्ट/साडी/सलवार कमीज, अॅप्रन, शूज बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता महाविद्यालय परिसरात शॉर्ट्स, स्कर्ट, हाफ पॅन्ट असे कपडे घालत येणार नाहीत.
विद्यापीठाच्या विद्या परिषदेने हा निर्णय घेतला आहे. ड्रेसच्या रंग निवडीचे अधिकार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. मात्र याबाबतची माहिती विद्यापीठाला देणे बंधनकारक असणार आहे.
याशिवाय परीक्षेसाठी विद्यार्थी/विद्यार्थीनी यांच्या कपड्यांविषयी काही नियम विद्यापीठाने केले आहेत. त्यानुसार परीक्षेला विद्यार्थ्यांनी अंगठी, गळ्यातील चेन, घड्याळ, मोबाईल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण जवळ बाळगू नये. तसेच शर्टाला छोटे बटन असावे, नक्षीदार बटन नसावे, अॅप्रन नसावे, टोपी, गॉगल, मनी पर्स, वॉलेट जवळ ठेवू नये. पायात चप्पल किंवा स्लिपर असावी. बूट घालू नये.
ड्रेस कोडसंदर्भातील नव्या निर्णयाचं परिपत्रक लवकरच महाविद्यालयांना पाठवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून अनेकदा तक्रारी आल्या होत्या. तर बऱ्याच तक्रारी कोर्टापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी सांगितलं.
विद्यापीठाच्या विद्या परिषदेत विद्यार्थ्यांच्या वतीने कोणालाही बोलावण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांवर लादला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या निर्णयाबाबत लवकरच समिती विद्यार्थांशी चर्चा करणार आहे.