नवी मुंबईत 'ड्रीम गर्ल'ला बेड्या! महिलेचा आवाज काढून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोन ठगांना अटक
ड्रीम गर्ल चित्रपटामधील हिरो आयुष्मान खुराना जसा मुलींचा आवाज काढून पुरूषांना प्रेम जाळ्यात फसवत होता. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.
नवी मुंबई : ड्रीम गर्ल चित्रपटामधील हिरो आयुष्मान खुराना जसा मुलींचा आवाज काढून पुरूषांना प्रेम जाळ्यात फसवत होता. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. आरोपी पुरूष महिलेचा आवाज काढून ज्वलर्स मालकांना आणि मेडिकल दुकानदारांची फसवणूक करून त्यांच्याकडचे पैसे लुटत होता. नवी मुंबई पोलिसांनी या दोन ठगास अटक करीत त्यांचा खेळ जगासमोर आणला आहे. आरोपींवर फसवणुकीचे 20 गुन्हे दाखल आहेत.
नवी मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, गुजरात आधी भागात महिलांच्या आवाजात फोन करून आपल्या जाळ्यात ओढत पैसे लुटल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. हा प्रकार नवी मुंबईत जास्त होऊ लागल्याने क्राईम ब्रॅन्च कडून विशेष पथकाची निर्मिती करीत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. विश्वसनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार तसेच तांत्रिक तपास करून आरोपीला अटक केली आहे.
मुख्य आरोपी मनिष शशिकांत आंबेकर वय 44 वर्ष राहणार पनवेल, तर त्याचा साथीदार अँथोनी तय्यप्पा जंगली वय 37 हा माटुंगा येथे राहणारा आहे. आरोपींकडून ज्वेलर्स व मेडिकल दुकानांची रेकी करून संपूर्ण माहिती घेतली जायची. शक्यतो हॉस्पिटल जवळच्या मेडिकल दुकानाला आरोपी लक्ष्य करत. यानंतर आरोपी फोन वर महिलेचा आवाज काढत स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून मेडिकल मधून औषधांची ॲार्डर करीत. आपल्याकडे 2 हजारांच्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत नोटा आहेत. मात्र त्या ऐवजी 500 रूपयांच्या सुट्या नोटा पाहिजेत असे सांगून पैसे मागवून घेत.
मेडिकल मालक औषधांची ॲार्डर घेवून हॉस्पिटल जवळ येताच आरोपीकडून प्रवेशद्वारावरच अडवले जायचे. आणलेले पैसे मॅडमनी आपल्याकडे द्यायला डॉक्टर सांगितले असल्याचे चित्र निर्माण करायचे. आणलेले पैसे घेतल्या नंतर हॉस्पिटल मध्ये जाऊन तुम्ही औषधे द्या आणि 2 हजारांच्या नोटा डॉक्टर मॅडम कडून घ्या असे सांगितले जायचे. मात्र प्रत्यक्ष हॉस्पीटल मध्ये गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मेडिकलच्या मालकांना कळून यायचे. हीच पध्दत ज्वलर्स दुकानदारांना वापरली जायची. लग्नासाठी दागिन्यांची ॲार्डर द्यायची आहे असे सांगून बोलवले जायचे. येताना सुट्टे पैसे घेवून येण्यास भाग पाडायचे. इमारतीच्या खाली उभा राहत ज्वलर्स मालकांकडून आणलेले पैसे घेतले जायचे. तुम्ही घरी जावून दागिन्यांची ॲार्डर घेत 2 हजारांच्या नोटा मॅडम कडून घ्या असे सांगितले जायचे.
यामध्ये पोलीसांना नवी मुंबईतील 2 तर पेण व अलिबाग मधील प्रत्येकी 1 अशा एकूण 4 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असून आरोपीकडून एकूण 5 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. मुख्य आरोपी मनिष आंबेकर याच्यावर मुंबईमध्ये 6, पुण्यामध्ये 1, पालघरमध्ये 1, मीरा भाईंदरमध्ये 3, ठाण्यामध्ये 6 नवी मुंबईमध्ये 1 असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत.