विद्यार्थ्यांना 'फी' साठी तगादा लावू नका, हप्त्यांमध्ये फी भरण्याची सवलत द्या, मुंबई विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयांना आदेश
शालेय संस्थांप्रमाणे मुंबईतील अनेक महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांकडे हे वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे शुल्क एक रकमी भरणे शक्य होत नाही.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ करू नये, तसेच गरजू विद्यार्थ्यांची अडचण असल्यास अशा विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शिक्षण फिस (ट्युशन फिस) यामध्ये हप्त्यामध्ये ( इंस्टॉलमेंट्समध्ये)भरण्याची सवलत देण्यात यावी, अशा सूचना मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आली असून त्यासंबंधी परिपत्रक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुहास पेडणेकर यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.
शालेय संस्थांप्रमाणे मुंबईतील अनेक महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांकडे हे वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे शुल्क एक रकमी भरणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ही महाविद्यालयांकडून प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारी विदयार्थी, विद्यार्थी संघटनानी केल्या होत्या.
याबाबत युजीसीने ( विद्यापीठ अनुदान आयोग) देखील याबाबत परिपत्रक काढून देशभरातील विद्यापीठांना फी बाबत तगादा न लावण्याच्या व आर्थिक परिस्थिती पाहून फी घेण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या होत्या. युजीसीच्या या सूचना मिळाल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने सुद्धा याबाबत परिपत्रक काढून मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था यांना फी बाबत सूचना केल्या आहेत.कोविड - 19 या जागतिक महामारीमुळे राज्यातील उद्योगधंदे / व्यवसाय / खासगी नोकरी आदी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले असून काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांनी फी वाढ करू नये. तसेच पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत, असे असले तरीही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून फी वसुलीसाठी तगादा लावला जात होता. त्यामुळे ही सक्ती थांबवण्यात यावी, तसेच कॉलेजांनी शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ करू नये, असे आदेश विद्यापीठाने द्यावेत, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.
संबंधित बातम्या :
- बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत आणि दहावीचा जुलै अखेरपर्यंत लागण्याची शक्यता
- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली : शिक्षणमंत्री उदय सामंत