100 कोटींच्या वसुलीच्या लेटरबॉम्बबाबत कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र
100 कोटींच्या वसुलीच्या लेटरबॉम्बबाबत कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत, असं प्रतिज्ञापत्र माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदिवाल आयोगाला दिलं आहे.
![100 कोटींच्या वसुलीच्या लेटरबॉम्बबाबत कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र Don’t have any more evidence to share on allegations against Anil Deshmukh says Param Bir Singh to probe panel 100 कोटींच्या वसुलीच्या लेटरबॉम्बबाबत कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/11/a2d342484141aed63d87c9cf8b0fd480_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या वसुलीचा लेटरबॉम्ब टाकणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्या आरोपासंदर्भात आपल्याकडे जास्तीचे पुरावे नसल्याचं या आरोपांचा तपास करणाऱ्या आयोगाला कळवलं आहे. परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे चांदिवाल आयोगाकडे ही माहिती नोंदवल्याचं PTI च्या बातमीत म्हटलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तात चांदिवाल आयोगाचे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटरच्या हवाल्याने चांदिवाल आयोगाकडे यापूर्वीच्या सुनावणीतच संबंधित प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेल्जियममध्ये असल्याचा आरोप रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता.
परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी सांगितल्याचा दावा केला होता. हे पत्र प्रकाशात आल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.
parambir singh : परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव - भाजप
याच प्रकरणी अनेक दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने काल रात्री उशीरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदिवाल यांची नियुक्ती केली आहे. चांदिवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी किंवा त्यांची बाजू आयोगापुढे मांडण्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. यासाठी न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाने त्यांना दोन वेळा आर्थिक दंडही सुनावला आहे. पहिल्यांदा गैरहजर राहिल्याबद्धल त्यांना रु. पाच हजार आणि दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याबद्धल त्यांना रु. 25 हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे.
या प्रकरणी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असलेले वकील शिशीर हिरे यांनी सांगितलं की परमबीर सिंह यांनी त्यांच्या आरोपासंदर्भात कोणतेही अतिरिक्त पुरावे देण्यात असमर्थता दर्शवली आहे. अॅड. शिशीर हिरे हे चांदिवाल आयोगाचे वकrल आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राशिवाय, त्यांच्या आरोपाबाबत त्यांच्याकडे अतिरिक्त तपशील किंवा पुरावे नसल्याचं परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे कळवल्याचं शिशीर हिरे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी परमबीर सिंह कोणत्याही उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचं हिरे यांनी सांगितलं.
Sanjay Raut PC : परमबीर सिंह पळून गेलेले नाहीत, त्यांना पळवून लावलंय : संजय राऊत
परमबीर सिंह यांच्याकडे त्यांनी केलेल्या सनसनाटी आरोपासंदर्भात कोणतेही पुरावे नसल्यामुळे, अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच ते ही चांदिवाल आयोगापुढे हजर होतील का असा प्रश्नव चर्चिला जात आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या पोलीस कारकिर्दीतील काही जुन्या प्रकरणांविषयीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातीलच दोन गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरन्टही बजावण्यात आलं आहे.
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब नंतर सीबीआय आणि ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले होते आणि अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)