Fact Check : बेस्ट 'इलेक्ट्रिक टॅक्सी' सेवा सुरू करणार का? काय आहे व्हायरल फोटोमागचे सत्य?
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट लवकरच 'बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी' सेवा सुरु करण्यात येणार असल्याचा फोटो आणि तसा मजकुर व्हायरल होत आहे.
मुंबई : मुंबईकर आणि बेस्ट प्रवासी यांना सतर्क करणारी एक बातमी आली आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट तर्फे लवकरच 'बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी' सेवा सुरु करण्यात येणार असल्याचा फोटो आणि तसा मजकुर व्हायरल होत आहे. या संदर्भात आम्ही सहानिशा केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. हा फोटो आणि मजकुर व्हायरल झाल्यानंतर खुद्द बेस्ट प्रशासनातर्फे याचा ट्विटरवरुन खुलासा करण्यात आला आहे. आमच्या फॅक्ट चेकमध्ये सदर फोटो आणि मजकूर खोट असल्याचे समोर आले आहे.
मुंबई शहरात लोकल रेल्वेनंतर बेस्ट ही शहराची जीवनवाहिनी समजली जाते. लॉकडाऊन काळात तर सर्वसामान्यांना रेल्वे बंद असल्याने मुंबईकरांचा सर्व भार बेस्ट बस सेवेवर आला आहे. आणि हा भार बेस्ट प्रशासनाने उत्तमरित्या सांभाळलाही. अशातच आता बेस्ट संदर्भात चुकीची माहिती आणि फोटो प्रसारित होत आहे. या फोटोतून बेस्ट लवकरच इलेक्ट्रिक टॅक्सी सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबद्दल बेस्टने खुलासा करणारे निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
बेस्टचे प्रसिद्धपत्रक..
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका लाल रंगाच्या मोटार कार वर बेस्ट उपक्रमाचा लोगो तसेच बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी असा उल्लेख आणि त्यासोबत चालकाचा गणवेश परिधान केलेला एक व्यक्ती असा फोटो व्हायरल केला जात आहे.
Clarification : Regarding viral photo in circulation of an electric cab showing it as BEST vehicle #fakenews #bestupdates pic.twitter.com/z7Z2gFrVo7
— BEST Bus Transport (@myBESTBus) August 26, 2021
मात्र, या फोटोबाबात मुंबईकर जनता, बेस्ट प्रवासी त्याचप्रमाणे पंत्रकारांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे. बेस्ट उपक्रमाने खरोखरच अशा प्रकारची टॅक्सी सेवा सुरु केली आहे का? किंवा भविष्यकाळात सुरु करण्याच्या विचार आहे का? अशा प्रकारचे विवध गैरसमज या फोटो आणि मजकुरामुळे निर्माण झालेले आहेत.
तरी अशा प्रकारची कोणतीही टॅक्सी सेवा बेस्ट उपक्रमाद्वारे सुरु करण्यात आलेली नसून नजिकच्या काळात तशा प्रकारची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे मुंबईकर जनता, बेस्ट प्रवासी त्याचप्रमाणे पत्रकार अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही छायाचित्र किंवा मजकुरावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.