Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
Mumbai News: पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पतीच्या प्रेयसीला हायकोर्टानं दिलासा दिला आहे.
Mumbai News : मुंबई : नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल होऊ शकत नाही, अशी टिप्पणी हायकोर्टानं एका याचिकेवर सुनावणी करताना केली आहे. प्रेयसी ही कोणत्याही नातेवाईकाच्या व्याख्येत बसत नाही, त्यामुळे नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. तसेच, कायद्याच्या चौकटीत बसणारं नात हे रक्ताचं, विवाहाचं अथवा दत्तक घेतल्यानंतरचंच असू शकतं, असं निरीक्षणही उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पतीच्या प्रेयसीला हायकोर्टानं दिलासा दिला आहे.
कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी एका महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत हायकोर्टानं पतीच्या प्रेयसीविरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करत, तिला दिलासा दिला आहे.
हायकोर्टाचं महत्त्वाचं निरिक्षण
कायद्याच्या चौकटीत बसणारं नातं हे एकतर रक्त्ताचं असतं, ते विवाहनंतर तयार होतं, अथवा दत्तक घेतल्यावर ते मानलं जातं. जर विवाहच झाला नसेल, तर स्त्री पुरूषातील नातं मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं एका निकालात स्पष्ट केलेलं आहे. कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार असलेली महिला तक्रारदार महिलेच्या पतीची प्रेयसी आहे. त्यामुळे तिच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असं हायकोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं आहे.
काय आहे प्रकरण?
पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचं एकानं फोन करुन त्याच्या पत्नीला सांगितलं. पत्नीनं पतीचा फोन चेक करताच त्यात पतीचे प्रेयसीसोबत फोटो आढळले. हे फोटो बघून पत्नीनं पतीला जाब विचारला. पतीनं उत्तर देण्यास टाळाटाळ केली. एके दिवशी पतीनं त्या प्रेयसीला सोन्याच्या बांगड्या आणि हार दिला होता. पत्नीनं विरोध करताच दारूच्या नशेत पतीनं पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत पत्नीनं पती आणि त्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवत प्रेयसीलाही यात आरोपी बनवंल. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत प्रेयसीनं दाखल केलेली याचिका मंजूर करत तिला दिलासा दिला आहे.