Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे
Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरे
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्तरावर हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही योग्यवेळी छगन भुजबळ यांना भेटायला जाऊ असे सांगितले. छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पण ते मंत्रिमंडळात नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे. त्यांची नाराजू दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे तटकरे यांनी म्हटले. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी स्वत: पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याशी बोललो आहे. सध्या मी आणि प्रफुल पटेल अधिवेशनामुळे दिल्लीत आहोत. तर नागपूरमध्येही हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यानंतर योग्य वेळ पाहून आम्ही छगन भुजबळ यांना भेटायला जाऊ. सुरुवातीच्या काळात प्रफुल पटेल यांनी भुजबळांशी चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी स्वत:च माघार घेत असल्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा यामुळे महायुतीला फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले.