Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?
तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का? मी मंत्री का झालो नाही याचा कारण मी कसं सांगणार, असे म्हणत भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलंय.
Sudhir Mungantiwar नागपूर : मंत्रीपद मला का मिळाले नाही? याची आता चर्चा करायची गरज मला वाटत नाही. जी जबाबदारी आहे ती मला पूर्ण करायची आहे. पक्षाचे नेते सांगेल ती जबाबदारी मला पूर्ण करायची आहे. त्यामुळे पदाच्या संदर्भात चर्चा करण्याचे आता दूर दूर पर्यंत कारण नाही. 14 तारखेनंतर असं काय झालं आता माहित करून घ्यायची मला गरज वाटत नाही आणि त्याचा संबंधही वाटत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी कळतील. आता केवळ अधिवेशनात भाग घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का? मी मंत्री का झालो नाही याचा कारण मी कसं सांगणार, स्वतःला याचं कारण कसं कळणार? असे म्हणत चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलंय.
नाराजीनाट्याच्या चर्चेनंतर तिसऱ्या दिवशी सुधीर मुनगंटीवार विधान भवनात
भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांचं मंत्रिपद कशामुळे नाकारण्यात आलं? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सोमवारी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मुनगंटीवार यांची भेट घेतली. तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे.
सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असे त्यांनी सांगितले आहे. आता सुधीर मुनगंटीवार यांना नेमकी कुठली जबाबदारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच आज विधिमंडळाच्या तिसऱ्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे विधान भवनात दाखल झाले आहे. यावेळी ते बोलत होते.
'जीवन चलने का है नाम, चलते रहो सुबह शाम'
बॉडी लँग्वेजमध्ये तुम्ही डिप्लोमा अथवा डिग्री केली आहे का? कुठल्या आधारावर मी नाराज आहे असं तुम्ही म्हणताय? मला मंत्रिपद का मिळालं नाही. आता चर्चा करण्यास मला आवश्यकता वाटत नाही. आमचे नेतृत्व भक्कम आहे प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेतात. या अगोदर ही कार्यकर्त्यांची त्यांनी काळजी घेतली आहे. आमचा पक्ष माझी योग्य ती काळजी घेईल, असा मला विश्वास आहे. आज आम्ही सत्तेत आहोत मात्र याआधी आम्ही इतके वर्ष विरोधात होतो, तेव्हा सुद्धा आम्ही काम केलं. सरते शेवटी 'जीवन चलने का है नाम, चलते रहो सुबह शाम' असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक बोलणे टाळले आहे.
आणखी वाचा