ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात मग्न: देवेंद्र फडणवीस
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही कटाक्ष टाकला.
मुंबई : 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि महाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यानंतर त्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका राज्यानं दाखल केली, तीदेखील सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल केली. त्यामुळं महाराष्ट्रात ओबीसीकरता कोणतंही आरक्षण राहिलेलं नाही, ही बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली.
सोमवारी घेण्यात आलेल्या एक पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही कटाक्ष टाकला. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात मग्न असल्याचं म्हणत त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.
15 महिने या सरकारने काहीच केलं नाही, असं म्हणत आपल्याला या बाबतीत राजकारण करायचं नाहीय, पण प्रत्येक गोष्टीसाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून मागच्याच सरकारला दोष लावण्यात येत आहे. पण, मुळात राज्याने मागास आयोगाची स्थापना करुन तपशील गोळा करत असल्याची माहिती दिली असती तर आरक्षण रद्दच झालं नसं असं म्हणत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी तोफ डागली.
ज्या राज्यांमध्ये ओबीसींना 50 टक्क्यांच्या वर आरक्षण आहे ते 50 टक्क्यांच्या आत आलं पाहिजे अशी मागणी करणारी याचिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आमचं सरकार होतं त्यावेळी न्यायालयात बरेच वाद - प्रतिवाद झाले. हे आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात सरसकट 27 टक्के असू शकत नाही, म्हणून तुम्ही ते सरासरीच्या प्रमाणानं द्यावं, अशी मागणीही करण्यात आली. यासंबंधीचा अध्यादेश काढत आम्ही 90 जागा वाढवल्या. अशातच ठाकरे सरकार सत्तेत आलं आणि पुढं आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खटला सुरु झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
खोटं बोलण्याची स्पर्धा भरवली गेली तर....
खोटं बोलण्याची स्पर्धा जगात भरवली गेली, तर पहिल्या दहामध्ये हेच येतील, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली. मराठा आरक्षणामागोमाग आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही हे नेते खोटं बोलत असल्याचं सांगत आपलं म्हणणं कोणीही गांभीर्यानं घेतलं नसल्याची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला तयार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठीही आपण तयार असल्याचं म्हणत यासाठी कोणासोबतही चर्चा करु. राजकारण मागे ठेवून यासंदर्भात आम्ही चर्चा करु, पण यावेळी समोरच्यांनीही राजकारण करु नये असा स्पष्ट आग्रही सूर त्यांनी आळवला.