डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केली : आनंदराज आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फुटांनी कमी केल्याचा दावा आनंदराज आंबेडकरांनी केला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
इंदू मिल येथील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक सरकारकडून उभारण्यात येणार आहे. मात्र स्मारक उभारणीमध्ये आंबेडकरी जनेतेची फसवणूक झाली आहे. तसेच या स्मारकाचे आधी दाखवलेले डिझाईन बदलल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फुटांनी कमी केल्याचा दावा आनंदराज आंबेडकरांनी केला आहे. आंबेडकर स्मारकाच्या आराखड्यात आधी पुतळ्याची उंची 350 फूट आहे, मात्र आता पुतळ्याची उंची 250 फूट करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकरांच्या स्मारकाची उंची कमी केल्याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशी न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.
इंदू मिल येथील जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच अशा 350 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लायब्ररी, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, भिक्खू निवासस्थान, विपश्यना सभागृह, पार्किग, म्युझियम आदींचा या आराखड्यात समावेश आहे. तीन वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आहे.