![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर
नवी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. शहरातील कोरोना संक्रमणात कमालीची घट झाली आहे.
![नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर Decrease in corona infection in Navi Mumbai, daily number from 1450 to 132 directly नवी मुंबईतील कोरोना संक्रमणात कमालीची घट, रोजची संख्या 1450 वरून थेट 132 वर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/11/3c24f87bf864bbed3d1d3efbec354c63_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या महिन्यात दीड हजारपर्यंत पोहचलेली दिवसभरातील कोरोना रुग्णसंख्या आता थेट दीडशेच्या आत आली आहे. महानगर पालिका प्रशासनाने केलेले ट्रेसिंग, एपीएमसीवर लावलेले निर्बंध आणि लॉकडाऊन या सर्वांचा परिणामामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट पसरायला लागल्यानंतर नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली होती. मार्चनंतर एप्रिल महिन्यात तर कोरोना संक्रमण दिवसाला दीड हजारांच्या घरात जावून पोचले होते. रोजच्या वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवरही कमालीचा ताण आला होता. यानंतर महानगर आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोना संक्रमण पसरवणाऱ्यांना ट्रेसिंग करण्यास सुरवात केली. यासाठी विशेष टीमची निर्मिती करून रोज 10 हजार लोकांचे टेस्टींग करण्यास सुरवात केली. याचा फायदा कोरोना संक्रमण रोखण्यात झाला.
दुसरीकडे एपीएमसी मार्केट मध्ये दिवसाला 25 ते 30 हजार लोकांची वर्दळ असल्याने तिथे कडक निर्बंध लावले. कोरोना टेस्ट केल्याशिवाय एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश करण्यास माथाडी कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर आदींना बंदी घालण्यात आली. हे होत असतानाच राज्य सरकारने लॉकडाऊन लावल्याने याचाही रूग्णसंख्या आवाक्यात येण्यात मदत झाली. या सर्वांचा परिणाम म्हणजे आज नवी मुंबईतील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या गेल्या 10 दिवसांत कमी होवून ती फक्त 132 वर आली आहे.
नवी मुंबईतील कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी महानगर पालिका आरोग्य विभागाने कोरोना रुग्णालयाचे जाळे शहरात उभे केले आहे. शहरातील प्रत्येक विभागात कोरोना उपचार सेंटर उभा केल्याने नागरिकांना घराजवळ उपचार मिळू लागले. पन्नास वर्षावरील व्यक्तींना रूग्णालयात दाखल होणे अनिवार्य करण्यात आल्याने ज्येष्ठांचे मृत्यू कमी करण्यात यश आले. वॉर रूम तयार करीत कोरोना पेशंटला कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड, ॲाक्सिजन, व्हेंटीलेटर मिळेल याची त्वरीत माहिती दिली जात असल्याने घरातील इतर लोकांना कोरोना संक्रमीत होण्यापासून रोखण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)