(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ग्राहकांचा गोंधळ! RBI कडून तीन महिने कर्जाचे हफ्ते न फेडण्याची मुभा; तरीही कर्जदारांना हफ्त्यांसाठी बँकांचे मेसेज
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटही देशावर आलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आरबीआयच्या कर्जदारांना पुढील तीन महिन्याचे हफ्ते न भरण्याची मुभा दिली होती. मात्र तरीही बँकाचे हफ्ते फेडण्यासाठी ग्राहकांना मेसेज येत आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसविरुद्ध अख्खा देश घरात बसून लढाई लढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या दरम्यान सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची पावलं उचलली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही कर्जदारांना मोठा दिलासा दिला. पुढील तीन महिने कर्जाचे हप्ते न भरण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिली. मात्र तरीही ग्राहकांना कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मेसेज येऊ लागले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 27 मार्चला निर्देश जारी करत म्हटलं होतं की, ग्राहकांना तीन महिने हप्ते न फेडण्याची सूट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना हप्त्यांसाठी तगादा न लावण्याच्या सूचनाही बँकाना देण्यात आल्या होत्या. मार्च महिना काल संपला आणि आजपासून एप्रिल महिना सुरु झाला. महिन्याची पहिली तारीख असल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षणासाठीचं कर्ज, अशा कर्जदारांना बँकाकडून मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. बँक खात्यात हप्ता जाईल येवढे पुरेसे ठेवा, असे मेसेज बँकांकडून येत आहेत. तसेच ईएमआय न भरल्यास बाऊन्स चार्जही लावण्यात येईल आणि अधिकचा जीएसटी लागणार, असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे.
मेसेज आल्यानंतर गोंधळलेल्या ग्राहकांनी बँकेत फोन केला. त्यावेळी तुम्हाला हप्ता भरायचा असेल तर भरा, अन्यथा नका भरू. मात्र बँकेने मेसेज का पाठवले ही चिंता आता ग्राहकांना सतावत आहे. आणि ईएमआय बाऊन्स झाला म्हणून कोणता अधिकचा चार्ज लागणार नाही ना, या विचारात सध्या ग्राहक आहेत. जर हे मेसेज ऑटोमेटिक आहेत, तर बँकेत असलेल्या बॅलेन्समधून कर्जाचा हप्ता कट होणार नाही ना? असे अनेक प्रश्न आता ग्राहकांना पडले आहेत.
संबंधित बातम्या
- निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता 'डिजिटल प्लॅटफॉर्म', संशयित व्यक्तींचं होणार जिओ मॅपिंग
- Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार
- PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण