Coronavirus | कोरोनामुळे धुम्रपान करण्यापासून रोखलं म्हणून पोलिसांवर अरेरावी; गुन्हा दाखल
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु काही लोक अरेरावी करत आपलचं म्हणणं खरं करत आहेत.
मुंबई : कोरोनाची भीती सर्वत्र पसरली असतानासुद्धा काही व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांना सिगरेट पिण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यासाठी या मंडळींना लोकांच्या संपर्कात येण्यास सुद्धा यांना हरकत नाही आहे.
ठाणे येथे असलेल्या "जी क्रॉप" कंपनीच्या बाहेर रात्री दीड ते दोनच्या सुमारास 20 ते 25 मुलं आणि मुली सिगरेट पीत होते, पोलीस गस्त घालत असताना पोलिसांनी त्यांना जाऊन विचारणा केली आणि त्यांना सांगितलं की, तुम्ही आता येथे थांबू नका, सध्या कॉरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि म्हणून त्यामुळे तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही आतमध्ये जा.
पोलिसांचं ऐकण्याऐवजी या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि आम्हाला दिवसाही सिगरेट प्यायला दिलं जात नाही आणि रात्री सुद्धा आम्ही पीत आहोत तर तुम्ही इथे येऊन बंदी घालत आहात. असा अजब तर्क लावत या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आहे. एवढचं नाहीतर सिगरेट पिणाऱ्या काही महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर सदर तरूण, तरूणी अरेरावी करत असल्यामुळे पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्याची वेळ आली.
पोलिसांनी यासर्वांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यातील कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी आधी विनंतीच्या स्वरात समाजूवूनही त्यांची अरेरावी सुरूच होती. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.
सध्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. एकिकडे मुख्यमंत्री सर्वांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे काही लोक कोरोना व्हायरसच्या संकटाचं गांभिर्य न ओळखता बिनदिक्कतपणे आपल्या मनाला वाटेल ते करत आहेत.