Coronavirus | कळव्यातील सहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा, तर मुंब्र्यात तब्बल पाच जणांना संसर्ग
कोरोनाचा प्रादूर्भाव देशासह संपूर्ण जगभरात दिसून येत आहे. अशातच ठाण्यात एक गंभीर बाब समोर आली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.
![Coronavirus | कळव्यातील सहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा, तर मुंब्र्यात तब्बल पाच जणांना संसर्ग Coronavirus Thane Update 6 year old girl in kalva is corona patient and 5 corona patient found in mumbra Coronavirus | कळव्यातील सहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा, तर मुंब्र्यात तब्बल पाच जणांना संसर्ग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/09232526/corona_web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : ठाणेकरांची चिंता वाढवणारी बातमी. कारण ठाण्यात गेल्या 24 तासांत तब्बल सात नवीन covid-19 बाधित रुग्णांची भर पडली आहे. यातील पाच रुग्ण हे एकट्या मुंब्रा या भागातील आहेत. तर इतर दोन रुग्ण हे कळवा भागातील असून त्यातील एक फक्त सहा वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्णांची संख्या 33 वर पोचली आहे.
कळवा विभागात आधीच सर्वाधिक Coronavirus चे रुग्ण सापडलेले असतानाच आज आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कळवा येथील एका सहा वर्षांच्या चिमुरडीला covid-19 ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला याची लागण कशी झाली, याचा तपास आता सुरू आहे. या चिमुरडीला covid-19 ची बाधा झाल्याने तिच्या घरच्यांचे विलगीकरण पालिकेकडून करण्यात आले आहे. याच कळवा विभागात corona ची बाधा झालेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला देखील covid-19 बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कळव्यात दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कळवा विभागात आतापर्यंत एकूण 12 रुग्ण आढळून आल्याने कळवा हा ठाण्यातील हॉटस्पॉट तर बनत नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पाहा व्हिडीओ : ठाण्यात कोरोना संशयितांवर 'कोवी गार्ड'ची नजर, ठाणे महापालिकेकडून अॅपचा वापर
दुसरीकडे मुंब्रा या विभागात एकाच दिवशी पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. काळसेकर हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी covid-19 ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच व्यक्तीच्या संपर्कात आढळून आलेले पाच रुग्ण आल्याने त्यांनादेखील हा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत मुंब्रा विभागात एकूण आठ रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा मृत्यूदेखील झाला आहे.
कळवा आणि मुंब्रा हे दोन ठाणे महानगरपालिकेतील covid-19 बाधित रुग्णांचे हॉटस्पॉट तर बनत नाहीयेत ना याकडे आता पालिकेने लक्ष द्यायला हवे. कळवा आधीच आठ दिवसांसाठी शट डाऊन केलेले असले तरी मुंब्रा येथील परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. त्यामुळे पोलीस आणि पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)