दोन महिन्यांत दहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांना तपासणारा डॉक्टर
मुंबईतील विविध भागात खासकरून झोपडपट्टी आणि चाळीत मेडिकल कँप सुरू केले आहेत. मागील दोन महिन्यांत आत्तापर्यंत डॉ. योगेश भालेराव यांनी 10 हजारांपेक्षा देखील जास्त रुग्ण तपासले आहेत.
मुंबई : कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणारा हा आकडा नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. या आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी खाजगी दवाखान्यातील डॉक्टर देखील समोर आले आहेत. विक्रोळीच्या टागोरनगर विभागात राहणारे डॉ. योगेश भालेराव यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईतील विविध भागात खासकरून झोपडपट्टी आणि चाळीत मेडिकल कँप सुरू केले आहेत. मागील दोन महिन्यांत आत्तापर्यंत डॉ. योगेश भालेराव यांनी 10 हजारांपेक्षा देखील जास्त रुग्ण तपासले आहेत. विशेष म्हणजे यासाठी डॉ. भालेराव कोणतही शुल्क आकारात नाहीत.
सध्या झोपडपट्टी आणि चाळीत पॉझिटिव्ह रुग्णांसोबत इतर आजारांनी त्रस्त रुग्ण आहेत. अशा रुग्णांवर मोफत उपचार करून गोळ्या औषधे देखील देण्यात येतं आहेत. याबाबत बोलताना डॉ. योगेश भालेराव म्हणाले की, सध्या प्रशासनावर मोठया प्रमाणात ताण आहे. एकीकडे दररोज कोरोना बाधितांचा वाढत जाणारा आकडा तर दूसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये डॉक्टरांची वाढती संख्या आशा दुहेरी संकटात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करत आहेत. अशा वातावरणात खाजगी दवाखान्यातील डॉक्टर मात्र स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी नकार देत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने चाळीत आणि झोपडपट्टी परिसरात मेडिकल कँप घेण्यासाठी सुरुवात केली आहे. यासाठी काही स्थानिक मित्रांनी देखील हात दिला आहे.
आत्तापर्यंत मुंबईतील विक्रोळी, माटुंगा, ठाणे, मुंब्रा, पूर्व द्रुतगती मार्ग आशा ठिकाणी जाऊन अनेक रुग्णांना मोफत रुग्णसेवा पुरवली आहे. मेडिकल कँपमध्ये सध्या रुग्णांच्या जखमा स्वच्छ करणे, मलमपट्टी करणे, मोफत औषधे देणे, रक्ताची मोफत तपासणी करणे गरजेचे असल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करणे अशा प्रकारची सेवा सुरू आहे. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू राहिल तोपर्यंत ही रुग्ण सेवा सुरूच राहणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे गोळ्या आणि औषधे मोफत देण्यावर आमच्यावर देखील मर्यादा येतं आहेत. शासनाकडे एवढीचं विनंती आहे की, जर गोळ्या आणि औषधे आम्हांला उपलब्ध करून दिलीत तर आम्ही मुंबईतील इतर भागात देखील काम करू शकू. सध्या या कामात प्रीती चव्हाण ही मुलगी कोणतही मानधन न घेता काम करत आहे.कन्नमवार नगरमधील स्थानिक रहिवाशी प्रीती गायकवाड कँपबाबत बोलताना म्हणाल्या की, आमच्या परिसरात ना पोलीस येतं आहेत ना कोणी वैद्यकीय अधिकारी.
सध्या आमच्या भागात अनेकजण आजारी आहेत. त्यांना विविध आजारांनी ग्रासलेलं आहे. याबाबत वारंवार स्थानिक सरकारी दवाखान्यात सांगून देखील कोणी आलं नाही. ही बाब लक्षात आल्या नंतर डॉ. योगेश भालेराव यांनी रुग्णांची तपासणी केली. आमच्या परिसरातील 600 नागरिकांवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत. या कँपचा आम्हांला चांगलाचं फायदा झाला आहे. अनेकांच्या मनात कोरोना बाबत असणारी भिती निघून गेली आहे.
Exercise With Mask | व्यायाम करताना मास्क लावणं धोकादायक, काय आहेत कारणं?