कोरोनाच्या नव्या प्रजातीनुसार लसींमध्येही वेळोवेळी सुधारणा
नागरिकांनी विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांना घाबरण्याची गरज नाही. मात्र, सतर्क राहणे गरजेचे आहे. विषाणू ज्या ठिकाणी आहे त्या प्रांतानुसार कालांतराने जनुकीय बदल हे होत असतात.
मुंबई : विषाणूमध्ये भौगोलीक परिस्थितीनुसार जनुकीय बदल होत असतात, त्यानुसार ब्रिटनमधील नवकोरना नंतर आता आफ्रिकेतील नवकोरोनाचे रुग्ण भारतात आढळून आले आहे. या दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील नवकोरोनावर कोविशील्ड परिणामकारक नसल्याने लसीचे 10 लाख डोस परत घ्यावेत, असे त्या देशाने पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट या कंपनीला कळविले आहे. या सगळया प्रकरणानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले असून लोकांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. मात्र दक्ष राहणे गरजेचे आहे, कारण आहे त्या लशींमध्येमध्ये नवीन विषाणूच्या जनुकीय बदलाप्रमाणे शास्त्रीय सुधारीत बदल घडवून ती संबंधित रुग्णांना देता येते, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. लसीमध्ये जनुकीय बदलाप्रमाणे सुधारीत बदल होत असतो हा शास्त्रीय पद्धतीचा भाग आहे हे यापूर्वी अनेकवेळा 'फ्लू'च्या लसीबाबत दिसून आलेले आहे.
दक्षिण आफ्रिकेतून परत आलेल्यांमध्ये दक्षिण आफ्रिकन स्ट्रेन असल्याचं समोर आलं आहे. सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी केली असून त्यांना क्वॉरंटाईन केलं आहे. याशिवाय ब्राझीलियन व्हेरिएंटशी संबंधीत एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्सचे संचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच भारतात ब्रिटनमधील नवकोरोनाचे आतापर्यंत 187 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमधील नवकोरोनाबाधित रुग्णांपैकी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना अलगीकरण केलं आहे. तसंच त्यांची चाचणीही करण्यात आली आहे. आमच्याकडे उपलब्ध लसीमध्ये कोरोना व्हायरसचा ब्रिटनमधील नवकोरोना निष्प्रभ करण्याची क्षमता आहे, असं बलराम भार्गव यांनी सांगितले.
याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात कि, "नागरिकांनी विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांना घाबरण्याची गरज नाही. मात्र, सतर्क राहणे गरजेचे आहे. विषाणू ज्या ठिकाणी आहे त्या प्रांतानुसार कालांतराने जनुकीय बदल हे होत असतात. हे सध्या कोरोनाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. मात्र, आमच्या प्रॅक्टिसमध्ये विशेष करून दरवर्षीं 'फ्लू'च्या लसीमध्ये नवीन बदलानुसार लस येत असते हे काही नवीन नाही. लशींमध्ये सुधारीत बदल होणं ही शास्त्रीय पद्धतीचा भाग आहे. नागरिकांनी मात्र या आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जे नियम आखून दिले आहे, त्याचे पालन केले पाहीजे.
कोरोनाच्या आजाराविरोधातील राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम जेव्हा जाहीर होतो. तेव्हा साहजिकच सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींचा विचार केलेला असतो. भारतासारख्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण हा तसा जिकिरीचा कार्यक्रम आहे, याची केंद्र आणि राज्य सरकारला व्यवस्थित माहिती आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ या विषयातील लस शोधण्याचे काम केले आहे. संसर्गजन्य आजारा विरोधातील लस विकसित करून त्यांची परिणामकारकता, सुरक्षितता आणि उपयुक्तता या संबंधित संस्था तपासत असतात. त्यानंतर सर्व बाबीचा करून लसींना आपातकालीन वापरासाठी मान्यता देण्यात येते.
"शास्त्रीय दृष्टीने पीहिले गेले तर अशा स्वरूपाच्या कोरोनाच्या प्रजाती भविष्यात आणखी येत राहणार आहे. कारण विषाणूंमध्ये कालातंराने जनुकीय बदल होत असतात हे सगळ्यांनीच स्वाईन फ्लूच्या वेळी पाहिलेले आहे. साथीच्या रोगात विषाणूची तशीच प्रक्रिया असल्याचे या अगोदर पहिले गेले आहे, कधी कधी तर त्या विषाणूची तीव्रता वाढते किंवा कमी होते. यामध्ये नवीन असे काही नाही मार्च-एप्रिल महिन्यात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 'फ्लू'च्या लसीमध्ये बदल होत असतात नवीन जनुकीय बदलाप्रमाणे या लसी सुधारित होऊन येत असतात. लसीमध्ये सुधारित बदल करणे हे विज्ञानच भाग आणि ती प्रक्रिया आहे ती अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही. एकाच आजारावरील लस बनविण्याचा वेगवेगळा फॉरम्युला असतो. "असे पुणे येथील केइएम रुग्णालयातील श्वसनविकार तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात.
डॉ. कुलकर्णी पुढे असेही सांगतात कि, "सध्या शब्दात सांगायचे झाले तर उदाहरण दाखल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मधील एखादे जुने सॉफ्टवेअर सध्याच्या अनेक कामात येत नाही तेव्हा आपण अपग्रेड व्हर्जनचे सॉफ्टवेअर घेतो तसेच लसीबाबत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. त्या लसीमधील बदलाकरिता संबधित कंपनीला ज्या काही परवानगी घ्याव्या लागत असतील ते त्या घेऊन करत असतात. "
तर, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, पहिली गोष्ट म्हणजे हे आफ्रिकेतील नवकोरोनाचे रुग्ण हे काही मोठ्या प्रमाणत आपल्याकडे आढळलेले नाही. जे काही त्या बद्दल सरकारनी योग्य ती काळजी घेतली आहे. त्यातही विशेष म्हणजे जनुकीय बदलानुसार लसीमध्ये सुधारित बदल होत असतात. दर सहा महिन्यामध्ये विषाणूमध्ये काही नवीन जनुकीय बदल आहे का याची माहिती संबंधित डॉक्टर, शास्त्रज्ञ घेत असतात आणि त्यानुसार बदल घडवत असतात."