(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ॲाक्सिजन सिलेंडर पुरवत वाचवले 261 जणांचे प्राण, कोरोना हेल्प ग्रुपचा अभिनव उपक्रम
कोरोना हेल्प ग्रुपने गेल्या 16 दिवसात 261 जणांचे प्राण वाचवण्यात मोलाचा हातभार लावला आहे. रूग्णांना कुठेच ॲाक्सिजनचा पुरवठा मिळत नसल्याने या टीमकडे संपर्क केला जातो. यांच्याकडून पोर्टेबल असलेला 8 किलोचा ॲाक्सिजन सिंलेंडर रूग्णांना फक्त 550 रूपयांना दिला जातो.
नवी मुंबई : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त होते आहे. मात्र हळहळ व्यक्त न करता थेट मैदानात उतरून काम करत कोरोना हेल्प ग्रुपने चक्क 261 जणांचे जीव वाचवण्यात हातभार लावला आहे. लहान ॲाक्सिजन सिलेंडरची मदत करत कोरोना रूग्णांना मोठा दिलासा दिला जात आहे.
84 वर्षांच्या रझीया यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची ॲाक्सिजनची पातळी खाली यायला लागली होती. महानगर पालिका, खाजगी रुग्णालयात प्रयत्न करूनही त्यांच्यासाठी ॲाक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होत नव्हती. दोन दिवस गेले तरी बेड मिळत नसल्याने रझीया बी यांची ॲाक्सिजन पातळी 70 वर आली होती. आता घरातील लोकांची चिंता वाढली होती. उपचाराविना रझीया यांचा मृत्यू होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने ॲाक्सिजन पुरवठा करणाऱ्या कोरोना हेल्प ग्रुपची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून आणलेल्या 8 किलोच्या ॲाक्सिजन सिलेंडरमुळे रझीया यांचे प्राण वाचले. त्यांची ॲाक्सिजन पातळी 70 वरून 98 पर्यंत वाढवण्यास मदत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि ॲाक्सिजन सिलेंडरच्या मदतीने रझीया यांचे घरातच उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती उत्तम झाली आहे.
रझीया यांच्याप्रमाणे अनेकांचे जीव या कोरोना हेल्प ग्रुपच्या टीमने वाचवले आहेत. ॲाक्सिजनमुळे होणारे मृत्यू पाहून तयार झालेल्या कोरोना हेल्प ग्रुपने गेल्या 16 दिवसात 261 जणांचे प्राण वाचवण्यात मोलाचा हातभार लावला आहे. रूग्णांना कुठेच ॲाक्सिजनचा पुरवठा मिळत नसल्याने या टीमकडे संपर्क केला जातो. यांच्याकडून पोर्टेबल असलेला 8 किलोचा ॲाक्सिजन सिंलेंडर रूग्णांना फक्त 550 रूपयांना दिला जातो. यासाठी टीमने स्वत: पैसे काढून ॲाक्सिजन सिलेंडर विकत घेतले आहेत. ज्यांना परवडत नाही त्यांना विनामुल्य ऑक्सिजन दिला जातो. ॲाक्सिजन सिलेंडर देताना खरच संबंधित रूग्णांना गरज आहे का याची पहिली पडताळणी केली जाते.
Corona crisis | 'या' कारणामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई काँग्रेस आमदारात मतभेद
नवी मुंबई बरोबर इतर शहरातूनही कोरोना हेल्प ग्रुपकडे ॲाक्सिजन सिलेंडरची मागणी केली जाऊ लागल्याने नेरुळ, सीबीडी, कांदिवली, कल्याण-डोंबिवली, पेण भागातही युनिट सुरू करण्यात आले आहेत. पेणवरून पनवेल, नवी मुंबईत पोहोचेपर्यंत वाटेत ॲाक्सिजन विना लोकांचा जीव जाऊ लागले होते. आता मात्र या लहान ॲाक्सिजन सिलेंडरच्या मदतीने रूग्ण सुखरूप हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे कोरोना हेल्प ग्रुपचे सदस्य अमित तणानी यांनी सांगितले.