Maharashtra Coronavirus : ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 रुग्णांचा मृत्यू? घटनेची चौकशी होणार, मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती
आज सकाळी ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हॉस्पिटल प्रशासन आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जमण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठाणे : ठाण्यातील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील खाजगी वेदांत रुग्णालयातील हा प्रकार मनसेचे पदाधिकारी संदीप पाचंगे यांनी उघडकीस आणला. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली असून ते या घटनेची माहिती घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी सहा सदस्यीय समितीकडून केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एवढंच नाहीतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीही सकाळी वेदांता रुग्णालयाला भेट दिली. तसेच या घटनेची शल्यचिकित्सकांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान वेदांता रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक, मनसे आणि भाजपचे पदाधिकारी जमलेले असून पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज सकाळी ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हॉस्पिटल प्रशासन आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जमण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ऑक्सिजनअभावी झाला की, अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत अद्यापही रुग्णालय प्रशासनानं कोणतीही माहिती दिलेली नाही.
दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, रुग्णालयातील ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं इतर ठिकाणाहून ऑक्सिजन मागवला होता. यासंदर्भात एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी रुग्णालय प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रुग्णालय प्रशासनानं हे चारही रुग्ण क्रिटिकल होते असं सांगितलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला आहे. जर ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला असता, तर एकाचवेळी अनेक रुग्ण दगावले असले. त्या वॉर्डमध्ये एकूण 35 रुग्ण होते, असं सांगितलं आहे. तसेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं. परंतु, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी सहा सदस्यीस समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांचाही या समितीत समावेश असणार आहे. जे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तत्काळ हकालपट्टी करा; किरीट सोमय्या यांची मागणी
आज ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोज राज्यात रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात, इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकलापट्टी का केली जात नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :