IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा; नाना पटोंलेचा हल्लाबोल
Congress On IPS Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्या होत्या. आता, त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे,
![IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा; नाना पटोंलेचा हल्लाबोल Congress Maharashtra President Nana Patole strongly criticize on state government decision IPS Rashmi Shukla appointed as Maharashtra Police DGP IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा; नाना पटोंलेचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/03/322f9859e69becd87ac4c2b2d4d172c91696346610333290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचे नाव पोलीस महासंचालकपदालसाठी चर्चेत आल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर, त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून टीकास्त्र सोडले आहे. आता महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा म्हणजे झाले, असा टोला नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्या होत्या. विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशीदेखील करण्यात आली होती. आता, पुणे पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला आहे. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, राज्यातले अनैतिक आणि असंवैधानिक सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात सर्वप्रकारची बेकायदेशीर कामे सुरु आहेत. गुन्हेगारांना जेलमध्ये घालण्याऐवजी बक्षीसे देऊन सन्मानित केले जात आहे. बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करून त्यांच्यावर पाळत ठेवणा-या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर खटला भरून त्यांना शिक्षा देण्याऐवजी येड्यांच्या सरकारने त्यांच्याविरोधातील खटले बंद करून त्यांना पोलीस महासंचालक करण्याचा निर्णय घेतला असल्याची बोचरी टीका नाना पटोले यांनी केली.
राज्यातले अनैतिक आणि असंवैधानिक सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात सर्वप्रकारची बेकायदेशीर कामे सुरु आहेत. गुन्हेगारांना जेलमध्ये घालण्याऐवजी बक्षीसे देऊन सन्मानित केले जात आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 3, 2023
बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करून त्यांच्यावर पाळत ठेवणा-या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर…
महाराष्ट्रात आता खुलेआम फोन टॅपिंग आणि विरोधकांवर पाळत ठेवण्याचे लायसन्स शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी रश्मी शुक्लांना दिले आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा प्रमुख एक बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्या केल्यावर आता पोलीस दलाकडून कायदेशीरपणे काम कसे होईल? असा सवाल नाना पटोले यांनी केला. पुरोगामी महाराष्ट्राला पोलीस स्टेटमध्ये रूपांतरीत करण्याचे पाप येड्यांच्या सरकारने आज केले आहे. आता महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा म्हणजे झाले, असा टोलाही त्यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)