एक्स्प्लोर
Shiv Jayanti Special | पाचशेहून अधिक 'शिवराई' नाण्यांचं जतन करणारा सच्चा 'शिवप्रेमी'
या चलनाची मुहुर्तमेढ महाराजांनी आपल्या राज्यभिषेकाच्या दिवशी म्हणजेच 6 जून 1674 रोजी रोवली. पुढच्या बाजूस 'श्री राजा शिव' आणि मागील बाजूस 'छत्रपती' असे देवनागरी लिपीत लिहिलेले 'शिवराई' हे नाणे समस्त महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतिक बनले. या ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह या शिवप्रेमीने बनवला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी माणसाचे आराध्य दैवत. त्यामुळे शिवरायांना आदर्श मानून त्यांचे आचारविचार अंगिकारण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न साकारले जात असताना महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलनही सोळाव्या शतकात अमलात आणले. या नाण्यांची ओढ आणि आकर्षण तमाम शिवप्रेमींमध्ये असते. पण, ती नाणी जमवण्याची आवड जोपासलेले काही मोजकेच असतात. त्यापैकी एक म्हणजे नालासोपाऱ्याचे राजा जाधव. त्यांना महाराष्ट्र सरकारनं साल 1997 मध्ये 'समाज भूषण' या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. राजा जाधव यांनी आपल्या आजवर 15 हजारांहून अधिक ऐतिहासिक नाण्यांचा 'नाणीसंग्रह' तयार झाला आहे. या नाण्यांतील विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेली शिवकालीन 'शिवराई' ही नाणी.
भारतीय रिझर्व्ह बँकेत कामाला असलेले राजा जाधव यांना कामासाठी साल 1982-83 दरम्यान गंगोत्रीला गेलेले असताना एका ठिकाणी एका खाटेवर लहान, मोठ्या आकाराची विविध भाषेची नाणी विकायला ठेवलेली त्यांना दिसली. त्याबाबत विचारणा केली असता ती नाणी ही शेकडो वर्षांपूर्वीची असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी त्यांचे लक्ष काही देवनागरी शब्द असलेल्या नाण्यांवर गेले तेव्हा ती शिवकालीन नाणी असल्याचे त्यांना समजले आणि ती सर्व नाणी त्यांनी विकत घेतली. तेव्हापासून जाधव यांचा नाणीसंग्रह करण्याचा प्रवास आजमितीस सुरू आहे. आज त्यांच्याकडे विविध प्रकारची नाणी असली तरी 'शिवराई' नाणी ही त्यांच्यासाठी खास आहेत.
राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांची सुवर्णतुला ज्या होनांत करण्यात आली होती त्यातील पाच ते सात होन आज भारतात शिल्लक असल्याची खंत जाधव व्यक्त करतात. त्यामुळे शिवकाळातला सोन्याचा 'होन' मिळणे दुर्लभ असले तरी ताब्यांची शिवराई मात्र अजूनही गड-किल्यांवर किंवा जुन्या शिवकालीन वाड्यांमध्ये, मंदिरात आढळून येत असल्याचे जाधव सांगतात. महाराजांनी एखादा गड काबीज केल्यास आनंदोत्सवात नाणी उधळली जात असतं. ती नाणी काहींना मिळत तर काही अद्यापही कडेकपाऱ्यात किंवा झाडांझुडपात अडकून पडलेली आहेत. पावसाळा सुरू झाला की, गडांवरून वाहणाऱ्या पाण्यातून ही नाणी पायथ्याशी वाहत येतात. ती नाणी गोळा करण्याचे काम करणाऱ्यांना झाडकरी म्हटलं जातं. अशा झाडकऱ्यांकडून आपण अनेक शिवकालीन नाणी जमा केली आहेत.
साताऱ्यातील गोसावी समाज आजही अशी नाणी गोळा करण्याचं काम करतो. तसेच नाशिक, पुणे इथूनही शिवराई नाणी मिळण्यास मदत झाल्याचं जाधव सांगतात. जाधव यांच्या दादरमधील निवासस्थानी पंचवीस ते तीस प्रकारची 500 हून अधिक शिवराई नाणी जमा आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, चित्रे अंकित आहेत. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारात असलेल्या शिवराईपैकी मोठ्या शिवराईचे वजन हे 8 ग्रॅम तर लहान शिवराईचे वजन 4 ग्रॅम आहे.
शेकडो वर्षांपूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा असल्यानं त्यांचे जतन करणही फार महत्वाचे आणि जोखमीचे आहे. या नाण्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक नाण्यांना होल्डर्समध्ये ठेवावी लागतात. काही नाण्यांना गंज लागू नये म्हणून त्यांना खोबरेल तेलात ठेवावे लागते, तर काही नाणी व्हॅसलिन लावून ठेवावी लागतात.
अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ अशी नाणी असून त्यात अकबराची चांदीची नाणी, अकबर दाम औरंगजेब, शहाआलम (एक आणि दोन), शहाजान, ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी, राणी एलिझाबेथ, यादव कालीन, मोहम्मद तुघलक, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रत्येक राज्यात काही विशिष्ट वापरली जाणारी नाणी जाधव यांच्याकडे आहेत. तसेच सातवाहन काळातीलही नाणी त्यांच्याकडे आहेत.
त्याव्यतिरिक्तही जुन्या नोटा, दुर्मिळ पुस्तकं, व्दितीय महायुद्धातील वृत्तपत्रातील मथळे, जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा एक दस्तऐवज असे अनेक ऐतिहासिक वारसे असलेलं त्यांचं स्वत:चं असं एक छोटेखानी संग्रहालय आहे. हे संग्रहालय शालेय विद्यार्थी ना मोफत पाहता येते. त्यांचा हा संग्रह पाहून दस्त्तुर खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील राजा जाधव यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement