मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालक, आयुक्तांना निर्देश
मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक, आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करुन याबाबतचे निर्देश दिले आहेत.
यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.
प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा जातो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांचा बंदोबस्त असतो. इतर वाहनं थांबवून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला मार्ग दिला जातो. नेते आणि मंत्र्यांचा ताफ्याचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे असा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जाते. यामुळे सर्वसामान्यांचा अनेक वेळा खोळंबा होतो. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा मंगळवारी (5 जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास उशिरा अपघात झाला होता. मुंबई महापालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झालं नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री शिंदेही सुखरुप होते.
जेव्हा उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञाताने कार घुसवली होती...
दरम्यान मागील महिन्यात 17 जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात होता होता वाचला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा राजभवन इथून वर्षा निवास्थानी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे सुरकक्षाकवच भेदले आणि आपली कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली. मलबार हिलवरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.