Andheri bypoll : शिंदे गट सर्वात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; थेट ऋतुजा लटकेंनाच आपल्या बाजूनं वळवणार?
Andheri East Bypoll Election 2022 : ऋतुजा लटकेंना पक्षात आणून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील? अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची नवी रणनीती, सूत्रांची माहिती
Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीआधी (Andheri East Bypoll Election) शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटांत शहकाटशहाचं राजकारण सुरु आहे. ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. लटके यांना शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडून उमेदवारी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मूरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज अजूनही भाजपकडून भरला गेला नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत. गुरुवारी ठाकरे गटाकडून (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. मात्र अद्याप ऋतुजा लटके यांचा राजीनामा प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट ठाकरेंना धक्का देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण निर्माण झाली आहे. मुंबई महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.
अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान
निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची पहिली निवडणूक असल्यानं ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ता राखणार की, शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) आपलं अस्तित्व सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :