Anil Deshmukh’s Bail Plea : दिवाळी घरी की तुरुंगात? अनिल देशमुखांच्या जामिनावर आज CBI न्यायालयाचा फैसला
Anil Deshmukh News : अनिल देशमुखांच्या जामिनावर आज सीबीआय न्यायालयाचा फैसला. 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी माजी गृहमंत्री 11 महिने तुरुंगात.
Court to Decide on Anil Deshmukh’s Bail Plea : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) प्रकरणातील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष सीबीआय कोर्टाकडून आज दुपारपर्यंत निकाल येईल. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झाला आहे. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयात जमा करण्यात आला आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल देशमुख 11 महिने तुरुंगात आहेत. दरम्यान, अनिल देशमुखांची दिवाळी घरी की जेलमध्ये होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
ईडीनं नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनीही या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. कथित भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयानं गुरुवारी (20 ऑक्टोबर) शुक्रवारी निर्णय सुनावला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीनं नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर 71 वर्षीय देशमुख यांनीही या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता.
2021 मध्ये अनिल देशमुख यांना झाली होती अटक
अनिल देशमुख यांच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना गेल्या आठवड्यात 'कोरोनरी अँजिओग्राफी'साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. देशमुख महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये गृहमंत्री होते.
अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. मार्च 2021 मध्ये, IPS अधिकारी परमबीर सिंह यांनी आरोप केला की, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या आपरो-प्रत्यारोपांच्या सत्रानंतर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.