'पेंग्विनकारण' तापणार? गुजरातच्या पेंग्विन पार्कला महापौर किशोरी पेडणेकरांची भेट, भाजपची गोची होण्याची शक्यता
Penguin: एकीकडे मुंबईतील राणी बागेतील पेंग्विन प्रकरणावरुन टीका करणाऱ्या भाजपची आता त्याच मुद्द्यावरुन गोची करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेले 'पेंग्विनकारण' आता अधिक तापण्याची शक्यता आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये पेंग्विन पार्क सुरू झालं असून त्या पार्कला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी भेट दिली आहे. गुजरातच्या पार्कमधील पेंग्विनची नावं ही आफ्रिकन असल्याची माहिती पेडणेकरांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे पेंग्विनवरुन सुरू असलेलं राजकारण संपण्याची चिन्हं नाहीत.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी आज गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणच्या पेंग्विन पार्कला भेट दिली. या पार्कमध्ये एकूण पाच पेंग्विन असून त्यांची नावं ही सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. ही सर्व नावं आफ्रिकन असल्याचंही किशोरी पेडणेकरांनी आवर्जून सांगितलं आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये (अहमदाबाद) देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आले आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) January 29, 2022
अहमदाबाद ,गुजरात या ठिकाणी एकूण ५ अफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. pic.twitter.com/SutGKytVwC
या आधी मुंबईतील पेंग्विनचं नाव हे ऑस्कर ठेवल्याने त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टीका केली होती. मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला पेंग्विनचं नाव मराठीत ठेवता आलं नाही का? असा सवाल चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना केला होता. त्यावर उत्तर देताना महापौर किशोरी पेडणेक म्हणाल्या होत्या की, "राणीच्या बागेतील पेंग्विन हा मुंबईकरच आहे, ऑस्कर नावाला आक्षेप घेणाऱ्या बोलक्या बाहुलीचा पक्ष तिकडे गोव्यात त्यांच्या भाऊबंधांकडे मतांची भीक मागत फिरतायेत. मुंबईत एक भूमिका आणि गोव्यात एक भूमिका अशी भाजपची दूतोंडी भूमिका आहे."
पेंग्विनवरुन पुन्हा राजकारण तापणार
मुंबईत राणी बागेतील कंत्राटे आणि पेंग्विनकरता होणाऱ्या खर्चावरुन भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: अहमदाबादेतील सायन्स सेंटरच्या पेंग्विन कक्षाला भेट देऊन अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेत. राणीबागेतील पेंग्विन पहाण्याचा तिकीट दर 25 ते 50 रुपये आहे तर अहमदाबादेतील पेंग्विन पहाण्याकरता 300 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आता राणीबागेचे पेंग्विन आणि अहमदाबादेचे पेंग्विन अशी तुलना सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या:
- राणीच्या बागेतील पेंग्विन हा मुंबईकरच,ऑस्कर नावाला आक्षेप घेणाऱ्या पक्षाची भूमिका दूतोंडी'; महापौर किशोरी पेडणेकरांचा निशाणा
- मुंबई पालिका कर्मचारी वाघांची देखभाल करु शकतात, पेंग्विनची का नाही?, नितेश राणेंचं महापौरांना पत्र