(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BMC : मुंबईत आतापर्यंत 3 हजार 679 मॅनहोलवर संरक्षक जाळी लावण्याचं काम पूर्ण, झाकणे न उघडण्याचे महापालिकेचे आवाहन
मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी उघडू नयेत असं आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबई: मुंबईत आतापर्यंत एकूण 3 हजार 679 मॅनहोलवर झाकणाखाली सुसज्ज आणि मजबूत अशा प्रकारची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कोणत्याही मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढू टाकू नयेत, त्यातून दुर्घटना घडू शकतात असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. मॅनहोलवरील झाकण नागरिकांनी काढल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध महानगरपालिका प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील पावसाळापूर्वी कामाचा भाग म्हणून दरवर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदादेखील ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करुन दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर देखील महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जाते.
या नियमित उपाययोजनांसोबतच मॅनहोलच्या झाकणाखाली प्रतिबंधक स्वरुपाची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरु आहे. आजपर्यंतचा विचार करता संपूर्ण मुंबईत मिळून 3 हजार 679 मॅनहोलवर झाकणाखाली संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात 2 हजार 945, पूर्व उपनगरात 293 तर पश्चिम उपनगरात 441 मॅनहोलवर संरक्षित जाळ्या लावल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावेळी महानगरपालिकेचे संबंधित विभागातील कर्मचारी पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा म्हणून सदर मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्याची सूचना देणारे फलक देखील लावलेले असतात. मात्र, कोणत्याही स्थितीत पाणी साचलेल्या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढून टाकू नयेत. कारण त्यातून अपघात घडू शकतात, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.