BMC Covid Khichdi Scam : कथित BMC खिचडी घोटाळ्यात मोठी अपडेट; कंत्राटदाराकडून किर्तीकर आणि चव्हाण यांच्या खात्यात 'इतकी' रक्कम जमा
BMC Khichdi Scam : शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांच्या खात्यात खिचडी घोटाळ्यातील कंत्राटदाराकडून रक्कम जमा झाली असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंबई : कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा (BMC Khichdi Scam ) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून (Mumbai Police EOW) या कोविड काळातील खिचडी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली. खिचडी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या कंत्राटदार कंपनीकडून अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात कंत्राटदार कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली असल्याचे तपासात आढळले असल्याची माहिती मुंबई पोलिसांमधील सूत्रांनी दिली. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाले होते.
सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. तर अमोल किर्तीकर हे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. खासदार किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही युवासेनेचे पदाधिकारी आहेत. अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण या दोघांनीही आपला राजकीय प्रभाव वापरून मुंबई महापालिकेच्या खिचडीचे कंत्राट मिळवून देण्यासाठी ठेकेदारांना मदत केली असल्याचा संशय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला आहे.
पैसे कधी जमा झाले?
कंत्राटदार नियमानुसार पात्र नव्हते. तरीही त्यांनाही कंत्राट देण्यात आले होते. खिचडी घोटाळा प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या फोर्सवन मल्टी सर्विसेस या कंपनीच्या खात्यातून आले सूरज आणि अमोल यांना पैसे पाठवण्यात आले. फेब्रुवारी 2021 ला यांच्या खात्यात पैसे आल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे. अमोल आणि सूरज हे दोघेही सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत.
अमोल आणि सूरज यांनी जबाबात काय म्हटले?
कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले. चौकशी दरम्यान या दोघांनाही खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत विचारणा करण्यात आली. चौकशीत या दोघांनी आपण, फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचे सांगितले. दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचा जबाबत उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.
सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स देऊन गेल्या काही दिवसात त्यांची चौकशी करत जबाब नोंदवला आहे. आता त्यांना पुन्हा कागदपत्रासोबत हजर राहण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेले आहेत.
16 रुपयांची खिचडी 33 रुपयांना
खिचडी घोटाळ्यात सुजित पाटकर यांना सुद्धा 45 लाख रुपये मिळाले असल्याचे समोर आले आहे. 16 रुपयांत बनवून घेतलेली खिचडी 33 रुपयाला विकली असल्याचे समोर आले आहे. यापुढी खिचडी घोटाळ्यात कोणकोणत्या राजकीय नेत्यांना पैसे देण्यात आले आहेत हे पुढील तपासात नक्कीच निष्पन्न होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे.
कधी झाला होता गुन्हा दाखल :
खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने 1 सप्टेंबरला आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. भादंवि कलम 406, 409, 420, 120 ब, 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल उर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, इतर बीएमसी अधिकारी, इतर संबंधित व्यक्ती यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सुमारे 6.37 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.