(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं! मुंबई महापालिकेची चौकशी निष्फळ
मुंबई महापालिकेच्या चौकशी अहवालातून काहीच समोर न आल्यानं शीतल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.
मुंबई : घाटकोपर येथील महिला गटारीतून वाहून गेल्या प्रकरणी मुंबई महापालिकेनं नेमलेल्या चौकशीतून काहीच निष्पन्न नाही. 3 ऑक्टोबर रोजी 32 वर्षीय शीतल भानुशाली ही महिला झाकण उघडं असलेल्या गटारीत पडल्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली होती. 4 ऑक्टोबरला तिचा मृतदेह हाजी अली येथील समुद्रकिनारी मिळाला होता. मुंबई महापालिकेच्या चौकशी अहवालातून काहीच समोर न आल्यानं शीतल भानुशाली यांच्या मृत्यूचे गूढ वाढले.
मुंबई महापालिका आता अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवणार आहे. शीतल दामा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या चौकशी अहवालात महिला मॅनहोलमध्ये पडल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. तसंच जिथं महिला पडल्याचे सांगितले जात होते, तिथले झाकण निघालेच नव्हते. सीसीटीव्ही उपलब्ध झाले नाहीत किंवा एकही प्रत्यक्षदर्शी मिळाला नाही. त्या गटारीचा प्रवाह हा माहिमकडे जातो, परंतु मृतदेह हा हाजीअलीला कसा गेला? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळं पुढील तपास पोलीस करणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यावेळी घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शीतल भानुशाली नावाची 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना समोर आली. पहाटे 3 वाजता संबंधित महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला. पण असल्फा ते हाजीअली हे अंतर जवळपास 20 ते 22 किमी आहे. मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या अंतरावर जाणं शक्य नसल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. शिवाय, महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या, ग्रील्स लावले आहेत. असल्फाच्या पुढे साकीनाका इथेही लावलेल्या ग्रील्सच्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते. त्यामुळे तब्बल 20 ते 20 किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.