BKC Covid Center : बिकेसी जम्बो कोविड केंद्राचा घोळ, मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवला, चार दिवस महिलेचा शोध
मुंबईतील बिकेसी जम्बो कोव्हिडं केंद्राने घातलेल्या घोळामुळे दोन कुटुंबाला प्रचंड मानसिक ताणाला सामोरे जावं लागले आहे. एका महिलेचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवल्याने चार दिवस महिलेचा शोध सुरु होता.
मुंबई : एकीकड कोरोनाने जवळची माणसं हिरावली तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्यांचं शेवटचं दर्शनही घेणे कुटुंबाचा नशीबी आले नाही. ही दुर्दैवी कहाणी आहे, तनाळकर आणि घोडके कुटुंबाची.
खरं तर आपल्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा अंतिम विधी तरी आपल्याला करता यावा ही प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. मात्र, 67 वर्षीय संगीता सदानंद तनाळकर यांचा अंतिम विधी हा त्यांच्या कुटुंबाला करता आला नाही, त्यांचा अंतिम विधी हा भलत्याच कुटुंबाने त्यांचं माणूस म्हणून केला. हे सगळे घडले आहे ते बिकेसी येथील जम्बो कोविड केंद्राच्या गलथान कारभारामुळे.
15 तारखेला कोरोनाग्रस्त संगीता तनाळकर यांना बिकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारास कुटुंबाने दाखल केले होते. याच वेळेस तिथे 72 वर्षीय रजनी परब यांना देखील उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने आणले. यावेळी या कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांनी घोळ केला. संगीता आणि रजनी यांच्या रजिस्टर क्रमांकाची आदलाबदली केली. याच दिवसांपासून कनाळकर कुटुंब आणि त्यांची मुलगी वैशाली घोडके या बिकेसी सेंटरमध्ये आपल्या आईची विचारपूस डॉक्टरांकडे करीत होत्या. मात्र, काही तासातच त्यांच्या आई या कोविडं केंद्रात नाहीयेत असे त्यांना कळले. त्यानंतर पुढील चार दिवस त्या कोविड केंद्रात पीपीई किट घालून आपल्या आईचा शोध घेत होत्या.
तिकडे रजनी परब यांच्या नावाने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ज्यात 18 तारखेला त्यांचा मृत्यूही झाला. डॉक्टरांनी संगीता यांचा मृतदेह परब कुटुंबाला रजनी म्हणून देऊन टाकला. परब कुटुंबाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले. इकडे घोडके आणि तनाळकर कुटुंबाचा शोध या सेंटरमध्ये सुरूच होता. परब कुटुंबाला दुसऱ्या दिवशी त्यांची आई जिवंत असल्याचे कळले आणि त्यांनी सेंटरशी संपर्क केल्यावर अंत्यसंस्कारसाठी दिलेला मृतदेह हा संगीता कनाळकर यांचा होता हे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत तनाळकर आणि घोडके कुटुंब प्रचंड त्रस्त झाले होते.
सध्या तनाळकर कुटुंब आणि संगीता यांचा शोध घेणारी त्यांची मुलगी सुरक्षेसाठी क्वारंनटाईन आहेत. मात्र, जम्बो कोविड केंद्राने केलेल्या घोळामुळे हे दोन्ही कुटुंब गेले पाच ते सहा दिवस प्रचंड मानसिक त्रासातून जात आहे. याबाबतची जबाबदारी पालिका प्रशासन उचलून काही कारवाई केली जाणार आहे का? असा संताप व्यक्त करीत प्रश्न त्यांचे शेजारी विचारत आहेत.
आधी चार दिवस आईचा कोरोना केंद्रात शोध, त्यात नंतर तिचा मृत्यू झाल्याचे कळणे आणि त्यातही दुर्दैवी म्हणजे तिचे अंत्यसंस्कार ही करता येऊ नये हे दुःखद तर आहेच. मात्र, व्यवस्थेबाबत चीड निर्माण करणारे आहे. कोविड केंद्रात जर वेळेत संगीता यांचा शोध घेतला असता तर आज आपल्या आईचे अंत्यसंस्कारही आपल्याला करता येऊ नये हे दुःख या कुटुंबाला नसतं. मात्र, प्रशासनाने केलेला घोळ मग त्यानंतर केलेले दुर्लक्ष यामुळे अखेर परब कुटुंबाकडून तनाळकर कुटुंबाला त्यांच्या आईच्या अस्थीची माहिती घ्यावी लागली आणि सायनच्या स्मशानभूमीतून या अस्थी त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. पुढे कदाचित पालिका जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करील ही, मात्र आपल्या आईवर अंत्यसंस्कार करता न आल्याचे दुःख हे तनाळकर आणि घोडके कुटुंबाला आयुष्यभर रहाणार आहे.