BMC Election 2026: मुंबईत शिंदे गटाने धनुष्यबाणावर लढायची ऑफर दिली पण भाजपवरील अटळ निष्ठेने पाय अडला, अक्षता तेंडुलकरांची वॉर्ड क्रमांक 192 मधून माघार
BMC Election 2026: शिवसेनेने हा वॉर्ड भाजपला न देता थेट शिवसेनेच्या चिन्हावर अक्षता तेंडुलकर यांना उमेदवारी देऊ केली, पण त्यांनी ती नाकारली.

मुंबई: भाजपच्या अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला. वॉर्ड क्रमांक १९२ मधून शिवसेनेने त्यांना लढण्याची ऑफर दिली होती. मात्र कमळ वगळता दुसऱ्या चिन्हावर लढण्यास अक्षता तेंडुलकर यांनी नकार दिला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. तिढा असलेल्या जागांसाठी पक्षांनी प्रयत्न केले, काही ठिकाणी बंडखोरी देखील झाली, दरम्यान वॉर्ड क्रमांक १९२ भाजपला मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र, शिवसेनेने हा वॉर्ड भाजपला न देता थेट शिवसेनेच्या चिन्हावर अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांना उमेदवारी देऊ केली, पण त्यांनी ती नाकारली. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं त्यांच्या सोशल मिडीयावरून सांगितलं आहे.(Akshata Tendulkar)
BMC Election 2026: हा वॉर्ड भाजपला लढवण्यास मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न
अक्षता तेंडुलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलंय की, एकमेव ओपन कॅटेगरीत असलेल्या वॉर्ड क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होते, काल दुपारपर्यंत भाजपच्या नेत्यांनी हा वॉर्ड भाजपला लढवण्यास मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र महायुतीच्या निर्णयानुसार हा वॉर्ड शिवसेनेला मिळाला. एक स्ट्राँग उमेदवार म्हणून शिवसेनेकडून मला हा वॉर्ड लढवण्यासाठी दुपारी ऑफर आली. त्यानुसार काही वरिष्ठांशी चर्चा करून या प्रयोगाविषयी चाचपणी करण्यात आली. याला अनुसरून काल आम्हाला सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर बोलावण्यात आले होते, त्यानुसार आम्ही तिथे भेट दिली, अशी माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
तर पुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, शिवसेनेतून लढण्याच्या प्रक्रियेनुसार पक्षप्रवेश व AB फॉर्म वाटप, दोन्ही एकत्र होणार होते. तिथे गेल्यावर काही काळ आमची चर्चा झाली व निर्णय घेण्यासाठी मी काही वेळ मागून घेतला. मी व माझ्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते घेऊन तिथून रात्री उशिरा आम्ही पुन्हा दादर कार्यालयात परतलो. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते असे ठरवले की वरिष्ठांची परवानगी असली तरी एका निवडणुकीसाठी मागील दहा वर्षांचे पक्षातील कार्य, हिंदुत्वासाठी सुरू असलेला लढा आणि भाजपा परिवार यांच्यापासून दूर व्हायचे नाही, लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढायचे. मात्र याबाबत मान्यता न मिळाल्याने मी सदर सीट न लढवण्याचा निर्णय घेतला. माझ्यावर दृढ विश्वास दाखवणाऱ्या मा.एकनाथजी शिंदे, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, तसेच मला साथ देणारे माझे सर्व सहकारी, माझ्यावर शुभेच्छा व आशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार, त्यांनी व्यक्त केले आहेत.
























