(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापालिकेत बायोमेट्रीक हजेरी पुन्हा सुरू होणार; कर्मचाऱ्यांची 100% उपस्थिती बंधनकारक
कोरोना संसर्गामुळे मुंबई महापालिकेत बंद करण्यात आलेली बायोमेट्रीक हजेरी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सोबतच सोमवारपासून कर्मचाऱ्यांना 100 टक्के हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.
मुंबई : पुढील सोमवारपासून (6 जूलै) मुंबई महापालिकेत बायोमेट्रीक हजेरी पुन्हा सुरू होणार आहे. सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे. तसंच, आजपासून मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची 100% उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. केवळ दिव्यांग/55 वर्षांवरील कर्मचारी/दीर्घ आजारी कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सूट देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन शिथील करण्याच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रीक हजेरी मुंबई महापालिकेत बंधनकारक केली जाणार आहे. बायोमेट्रीक हजेरीच्या नोंदीसह कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थितीही बंधनकारक करण्याचे परिपत्रक जारी केलं गेलंय. 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचारी घरीच होते. परंतु, त्या आधीपासून कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद केली होती.
मुंबईत 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू! जमावबंदीसह नाईट कर्फ्यू
100 टक्के उपस्थिती बंधनकारकपण लॉकडाऊनच्या दोन महिन्यांनंतर महापालिकेने अत्यावश्यक सेवांसह इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती नोंदवणे बंधनकारक केले. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती असेल त्यांनाच पूर्ण पगार आणि त्याखालील उपस्थिती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपस्थिती दिवसांप्रमाणेच पगार दिला जाईल, असा निर्णय घेतला गेला. त्यानंतर पुन्हा सुधारीत परिपत्रक काढून प्रशासनाने 75 टक्के उपस्थिती बंधनकारक केली. परंतु, त्यानंतरही कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रशासनाने 72 तासांमध्ये कामावर उपस्थित राहा, अन्यथा बडतर्फ केले जाईल, असे फर्मान जारी केले. त्यामुळे बहुतांशी कर्मचारी कामावर परतले. पण आता त्यानंतर सामान्य प्रशासनाने 100 टक्के उपस्थितीचे सुधारीत परिपत्रक जारी करताना या उपस्थितीबरोबरच बायोमेट्रिक हजेरीही बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाणार आहे. यासाठी सर्व बायोमेट्रिक हजेरीची यंत्रे कार्यान्वित करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
हजेरी नोंदवण्यासाठी सूट बायोमेट्रिक हजेरी नोंदवल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. तसेच, सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कार्यालयीन वेळेच्या 60 मिनिटं विलंबानं किंवा 60 मिनिटं आधी देखील बायोमेट्रिक सुविधा देण्यात येणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाचा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक राहील.
coronavirus | मुंबईत मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड