भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना; 13 दिवस उलटूनही अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या शोधात बापाची वणवण सुरूच
तब्बल 13 दिवस शब्बीर एकटेच या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला घुटमळतांना दिसत आहेत. शब्बीर रोज इथे येतात ढिगाऱ्यातील दगड विटा व इतर मलबा बाजूला करताता आणि त्याखाली आपल्या अडीच वर्षांच्या मुसेफचा शोध घेतात.
![भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना; 13 दिवस उलटूनही अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या शोधात बापाची वणवण सुरूच Bhiwandi Jilani building incident; after 13 days father search his two and a half boy भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना; 13 दिवस उलटूनही अडीच वर्षांच्या चिमुरड्याच्या शोधात बापाची वणवण सुरूच](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/04034949/WhatsApp-Image-2020-10-03-at-10.08.21-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भिवंडी : भिवंडी शहरातील जिलानी इमारत 21 सप्टेंबरला पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोसळली होती. धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथे ही तीन मजली इमारत होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक जण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. या दुर्दैवी घटनेत कुणाची आई कुणाचे बाबा, कुणाचा भाऊ कुणाची बहीण कुणाचा मुलगा कुणाच्या लेकीचा बळी गेला आहे. आजही ही घटना आठवली तर या घटनेत आपला जीव वाचलेल्या मात्र परिवार गमावलेल्या माणसांना अश्रू अनावर होत आहेत.
शब्बीर कुरेशी या दुर्घटनेत वाचले, मात्र त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या दुर्घटनेत शब्बीर कुरेशी यांनी आपल्या पत्नीसह दोन लहानगी मुले गमावली आहेत. शब्बीर कुरेशी यांची 28 वर्षीय पत्नी परवीन कुरेशी यांच्यासह चार वर्षांची मुलगी मरियम व अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ असे तीन जण या दुर्घटनेत मृत्यू पावले. तर त्यांची दोन मुले आठ वर्षांचा सादिक व सहा वर्षांचा शाहिद ही दोन मुले या दुर्घटनेत वाचली आहेत. मात्र त्यांचा अडीच वर्षांचा मुसेफ हा या दुर्घटनेनंतर आजही बेपत्ता आहे.
शोध व बचावकार्य पूर्ण! भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी
बेपत्ता मुसेफच्या शोधासाठी शब्बीर दररोज दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ येऊन आपल्या चिमुरड्याचा शोध घेत आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्याची येथील शोधमोहीम चार दिवसांनंतर थांबली आहे. मात्र तब्बल 13 दिवस शब्बीर एकटेच या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला घुटमळतांना दिसत आहेत. शब्बीर रोज इथे येतात ढिगाऱ्यातील दगड विटा व इतर मलबा बाजूला करताता आणि त्याखाली आपल्या अडीच वर्षांच्या मुसेफचा शोध घेतात. मात्र तो मिळत नसल्याने हताश व निराश होऊन पुन्हा थकल्या पावलांनी घरी परततात. शाब्बीरचा हा दिनक्रम तब्बल 13 दिवसांपासून अविरत सुरूच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)