CSR Journal Excellence Award: आपल्या भाषेचा वापर करणेही सामाजिक जबाबदारी आहे: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Bhagat Singh Koshyari: ''आपल्या देशातील भाषेचा प्रचार-प्रसार करायला हवा. हे करताना आपण आपल्या भाषांचा स्वाभिमान बाळगायला हवा, असं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत.
Bhagat Singh Koshyari: ''आपल्या देशातील भाषेचा प्रचार-प्रसार करायला हवा. हे करताना आपण आपल्या भाषांचा स्वाभिमान बाळगायला हवा. आपल्या भाषेचा वापर करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे'', असं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत. द सीएसआर जर्नल ॲक्सिलन्स अवाॅर्ड 2021 (CSR Journal Excellence Award 2021) मध्ये उपस्थित लोकांना संबधोत करताना ते असं म्हणाले आहेत. द सीएसआर जर्नल ॲक्सिलन्स अवाॅर्ड हा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या स्वरूपात देशातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये गणला जातो. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
भगतसिंग कोश्यारी म्हणाले, ''कोरोनाच्या काळात अनेक लहान-मोठ्या लोकांनीही मदतीचे काम केले आहे. सामाजिक कार्याची ही जबाबदारी आता प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. हे केवळ मोठ्या कॉर्पोरेट्ससाठीच महत्त्वाचे नाही, तर प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.''
आमटे दाम्पत्य जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित
या पुरस्कार सोहळ्या प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना सीएसआर जर्नलकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी लोकांना संबोधित करताना भगतसिंग कोश्यारी यांनी आमटे दाम्पत्य यांचा ही उल्लेख केला आहे. भाषेचे महत्व सांगतांना ते म्हणाले आहेत की, ''प्रकाश आमटे हे जंगलात काम करतात. या कामासाठी त्यांनी इंग्रजी हे माध्यम ठेवले तर चालणार नाही. मग मराठी सोबतच तेथील स्थानिक भाषांवर देखील काम करत पुढे जावं लागेल.''
मेहनतीला पर्याय नाही : दिलीप वेंगसरकर
या कार्यक्रमात भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर देखील उपस्थित होते. ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत की, ''कोणत्याही गोष्टीला शाॅर्टकर्ट नसतो. मेहनत करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणून कोट्याही गोष्टीसाठी शाॅर्टकर्ट मारण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे काका, वडील नातेवाईक क्रिकेटर जरी असले तरी तुम्हाला मेहनत करावीच लागते.'' ते म्हणाले, मी 1998 साली क्रिकेट ॲकॅडमी सुरू केली. अनेक सामान्य कुटुंबातील मुलं दुरून यायची आणि मेहनत करायची. सीएसआर फंडिंगमुळे माझ्या ॲकॅडमीला आणि मुलांना मोठा फायदा झाला. माझ्या ॲकॅडमीतला एक मुलगा मागील 3 वर्षांपासून आयपीएस खेळवतोय आणि त्याचं वार्षिक उत्पन्न 4 कोटी आहे, असं ते म्हणाले आहेत.