एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाळासाहेबांना शब्द दिलाय, राजा आणि दादूची भेट घडवणार : बाळा नांदगावकर
मुंबई: "राजा आणि दादू (उद्धव ठाकरे) यांना एकत्र आणण्यासाठी मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे. माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी प्रयत्न करत राहणार", असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. ते 'माझा कट्टा'वर बोलत होते.
बाळा नांदगावकर यांनी शिवसेना - मनसेच्या युतीबाबतच्या सर्व प्रश्नांना 'माझा कट्टा'वर उत्तरं दिली.
आमच्या नेत्यांचं कुठंतरी चुकलं असेल. त्यामुळेच पक्षाला गळती लागली आहे. आम्ही त्या चुका सुधारु असं म्हणत नांदगावकर यांनी मनसेच्या चुकाही मान्य केल्या.
मी ठाकरे कुटुंबाच्या जवळचा आहे. त्यामुळे राज आणि उद्धव यांच्यात वाद असला, तरी मी ठाकरे कुटुंबापासून दूर जाऊ शकत नाही. त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
विधानसभेवेळीही राज-उद्धव मनोमिलनासाठी प्रयत्न
विधानसभेवेळीही मी राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला. मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी दोन भावंडं एकत्र येणं गरजेचं आहे. त्या हेतूनेच मी 'मातोश्री'वर गेलो, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरेंचे उद्धव यांना 7 कॉल
राज ठाकरेंनी उद्धवसाहेबांना 7 फोन केले, त्यातील 3 माझ्यासमोर केले, असं बाळा नांदगावकर म्हणाले. याशिवाय शिवसेना-भाजप युती तुटण्यापूर्वी राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातही फोनवरुन बोलणं झालं. त्याबाबत मी अधिक बोलणार नाही, असं नांदगावकरांनी नमूद केलं.
भाजपचा डाव
भाजपचा फुटीर डाव मला दिसतोय. मुंबईतून अनेक कार्यालयं हलवली जात आहेत. मुंबई ही मराठी माणसाचीच राहिली पाहिजे, त्यामुळे मुंबईसाठी राज-उद्धव एकत्र येणं गरजेचं आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
मनसे संपणार नाही
कोणताही पक्ष सहजासहजी संपत नाही, मी 40 वर्षांच्या राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले. आम्ही चुका सुधारुन पुन्हा नव्याने उभं राहू, असा विश्वास नांदगावकरांनी व्यक्त केला.
राणे, भुजबळांनी पक्ष काढला का?
शिवसेनेतून अनेकजण फुटून गेले, नारायण राणे, छगन भुजबळ यांनीही शिवसेना सोडली. मात्र पक्ष स्थापन करण्याची धमक एकट्या राज ठाकरेंमध्येच होती, असं नांदगावकर म्हणाले.
निवडणुकीनंतर एकत्र येणार का?
निवडणुकीनंतर गरज पडल्यास शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नांदगावकर म्हणाले, "तो त्यावेळचा प्रश्न असेल. आताच त्याबाबत सांगणार नाही".
अमित ठाकरे घडत आहेत
एकीकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अमित ठाकरे दिसत नाहीत, त्याबाबत नांदगावकर यांना विचारण्यात आलं.
नांदगावकर म्हणाले, "अमित ठाकरे हे राज ठाकरेंच्या तालमीत तयार होत आहेत. ते आधी कार्यकर्ता म्हणून घडत आहेत. आधी कार्यकर्ता घडतो, मग नेता होतो"
बाळासाहेबांनी आठवण काढली हे माझं भाग्य
बाळासाहेब ठाकरे जेव्हा लीलावती रुग्णालयात होते, तेव्हा राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी बाळासाहेबांनी बाळा नांदगावकर आला नाही का, असं विचारलं. बाळासाहेबांनी आजारी असतानाही माझी आठवण काढणं हे माझं भाग्य होतं. मी बाळासाहेबांच्या जवळचा होतो. शिवसेना सोडली त्यावेळी मी एकटा असा होतो, ज्याने बाळासाहेबांना सांगून राज ठाकरेंसोबत गेलो होतो, अशी आठवण नांदगावकरांनी सांगितलं.
माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे
- माझाकट्टा: सोडून गेलेल्या लोकांचा स्वत:वर विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला - बाळा नांदगावकर
- माझाकट्टा: राणे, भुजबळ शिवसेना सोडून गेले, पण स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची धमक राज ठाकरेंमध्येच - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: आमच्यात पक्ष चालवण्याची हिम्मत आहे, शिवसेनेत विलीन करण्याचा प्रश्न नाही - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात फोनवरुन बोलणं झालं, त्याबाबत राऊत यांनी अधिक सांगावं - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: दोन भावंडांमध्ये वाद आहेत, पण मी ठाकरे कुटुंबापासून दूर जाऊ शकत नाही - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: बाळासाहेबांना शब्द दिलाय, दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: होय आमचं आणि आमच्या नेत्यांची चूक झाली, आम्ही राज्यभर फिरलो नाही - बाळा नांदगावकर #माझाकट्टा: आम्ही चूक सुधारु, राज्यभर फिरू, काम करु - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: प्रवीण दरेकर माझे मित्र, अधिक काही बोलणार नाही, त्यांना शुभेच्छा - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: फेसबुक, व्हॉट्सअपवरुन मेसेज काय करता, मी स्वत: मातोश्रीवर गेलो - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: संजय राऊत आणि राज ठाकरे यांना दोघांनाच प्रस्तावाची माहिती - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: संजय राऊत आणि राज ठाकरे यांना दोघांनाच प्रस्तावाची माहिती, मी त्याबाबत बोलणार नाही - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: आम्ही एकत्र आलो तर मुंबई आमच्या माणसाच्या ताब्यात राहिल - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: विकास या मुद्द्यावरच मनसेची स्थापना, ब्लू प्रिंट आम्हीच बनवली- बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: आम्ही BMC मध्ये विरोधात होतो, तिथे चोख भूमिका बजावली - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: आमच्याकडून चुका झाल्या, पण घोटाळे नाही झाले - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: उद्याचं संकट आम्हाला दिसतंय, त्यासाठी शिवसेना-मनसे एकत्र येणं गरजेचं - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मराठी माणसाची अटीतटीची आणि मुंबईची आरपारची लढाई - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मुंबईतून एक-एक कार्यालयं हलवत आहेत, भाजपचा हा डाव आहे - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मोदी चांगलं काम करत होते, तेव्हा राज ठाकरेंनी कौतुक केलं - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी जाहीर केले, पण 500 रुपयेही दिले नाहीत- बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: आज मी जाहीर करतो, आमचा प्रस्ताव तयार आहे, शिवसेना युतीसाठी तयार आहे का? - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: शिवसेना सोडताना मी बाळासाहेबांना सांगितलं होतं, साहेबांना सांगून पक्ष सोडणार मी एकटाच होतो - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: बाळा आला नाही का हे राज ठाकरेंना बाळासाहेबांनी विचारलं होतं, हे माझं भाग्य आहे - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मी बाळासाहेबांना भेटलो होतो, राजा आणि दादू(उद्धव) एकत्र आले तर बरं होईल असं म्हणाले होते- बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी प्रयत्न सोडणार नाही - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: लोकसभा निवडणूक लढू नये अशी माझी वैयक्तिक भूमिका होती - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मनसेकडे मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी, सोलापूर या सर्व ठिकाणी उत्तम उमेदवार आहेत - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: मराठी माणूस म्हणून शिवसेना-मनसेच्या युतीसाठी प्रयत्न केले, त्याला लोटांगण का म्हणता?- बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: पक्ष सोडून गेले ते ठिकाय, नवे येतील, जुनं ते सोनं, नवं ते हवं - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: अमित ठाकरेंना कार्यकर्ता म्हणून घडवतोय, नेता म्हणून पुढे आणायचं नाही - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: आम्ही नाशिकमध्ये करुन दाखवलं, आम्हाला कामाचा अनुभव - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: युती झाली तर केवळ शिवसेनेशी, अन्य पक्षाशी युती नाहीच - बाळा नांदगावकर
- #माझाकट्टा: निवडणुकीनंतर जवळ यायचं की नाही तो नंतरचा भाग - बाळा नांदगावकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement