(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ॲाटो मोबाईल इंडस्ट्रीची कोरोनावर मात; आरटीओच्या तिजोरीत बक्कळ महसुलाची भर
लॉकडाऊन लागू केल्यानंतर सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) महसूल पूर्णपणे थांबला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली वाहन नोंदणी आणि अन्य करांतून आरटीओच्या तिजोरीत 2 हजार 768 कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडली आहे.
मुंबई : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले होते. परिणामी अर्थचक्र मंदावली होती. पण काही उद्योगधंदे किंवा उद्योगक्षेत्र याला अपवाद ठरत आहेत. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांचे कंबरडे मोडले असताना गाडी खरेदी विक्री व्यवसायावर मात्र कोरोनाचा काहीही परिणाम झालेला नाहीये. कारण अगदी सणांच्या तोंडावर सरकारने अनलॉक मिशन बिगेन अंतर्गत गाड्या खरेदी विक्रिला परवानगी दिल्याने खिळ बसलेल्या गाडी खरेदी विक्रीच्या व्यवसायाला अचानक उभारी आली आहे. कारण तीन महिन्यांतच लाखो गाड्यांची खरेदी ग्राहकांनी केली आहे.
कोरोनामुळे सर्वच व्यवसायांचे कंबरडं मोडलं ही परिस्थिती पुढे भयानक होवू नये याकरता सरकारने विविध पातळींवर टप्प्या टप्प्याने अनलॉक करायला सुरुवात केली. तरीही कोलमडलेले व्यवसाय काय उभारी घ्यायला तयार नव्हते. पण सणांची पार्श्वभूमी लक्षात घेता अनेक शोरुम मॉल उघडण्यास सरकारने परवानगी दिली आणि हा अनलॉक व्यावसायिकांच्या पथ्यावर पडला.
लॉकडाऊन लागू केल्यानंतर सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) महसूल पूर्णपणे थांबला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली वाहन नोंदणी आणि अन्य करांतून आरटीओच्या तिजोरीत 2 हजार 768 कोटी रुपयांच्या महसुलाची भर पडली आहे. यापैकी 90 टक्के महसूल हा वाहन नोंदणीतून मिळाला आहे. तर 52 हजार 402 परमिट, वाहनांच्या वेगवेळ्या कामांतून मिळालेला कर, वार्षिक दराने भरलेला कर, प्रोसेसिंग फीस आणि इतर करा पायी राज्याला जवळपास 28 लाख रुपये मिळाले आहेत.
कोरोना संकटातही आरटीओच्या तिजोरीत महसुलाची भर :
- यंदा एप्रिल ते 14 नोव्हेंबपर्यंत 7 लाख 65 हजार 927 वाहनांची नोंदणी झाली आहे. - यांत 7 लाख 30 हजार 55 खाजगी गाड्यांची नोंदणी झाली आहे. - तर 35 हजार 882 व्यावसायीक गाड्यांची नोंदणी झालीये - या नोंदणी झालेल्या गाड्यांच्या माध्यमातून राज्याला 2 हजार 768 कोटी रुपये करापोटी मिळाले.
लॉकडाऊन काळात जवळपास 3 महिने ॲाटो मोबाईल इंडस्ट्री पुर्णत: बंद होती. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 20 ते 30 टक्के वाहनांची खरेदी होईल असा अंदाज बांधला जात होता. पण सणांच्या तोंडावर वाहन खरेदी विक्री अनलॉक केल्याने वाहनांची खरेदी थेट 50 ते 60 टक्क्यांवर पोहचली आहे. जर असाच प्रतिसाद ग्राहक देत राहिले तर वर्षाअखेर ही वाहन खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त 10 ते 15 टक्क्यांनी कमी असेल, असा अंदाज ॲाटो मोबाईल तज्ञ व्यक्त करत आहेत.