(Source: Poll of Polls)
Mumbai Cruise Drugs Case : आर्यन खानला दिलासा; दर आठवड्याला मुंबई NCB च्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथील
Aryan Khan Case : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. दर आठवड्याला मुंबई एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथील करण्यात आली आहे.
Aryan Khan Case : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता एनसीबीच्या (NCB) दिल्ली एसआयटीकडे असल्यानं दर आठवड्याला एनसीबीच्यी मुंबईतील कार्यालयात हजेरी लावण्याची आता आवश्यकता नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं ही अट रद्द केली आहे. जर एनसीबीला आर्यनची चौकशी करायची असल्यास तपासयंत्रणेनं तशी नोटीस जारी करावी. दिल्लीतील कार्यालयात हजेरीसाठी किमान 72 तास आधी एनसीबीच्या एसआयटीनं आर्यनला नोटीस द्यावी, असे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी बुधवारी जारी केले.
कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी हायकोर्टानं जामीनासाठी घातलेल्या काही अटींशर्तींमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली होता. आर्यनच्या दर आठवड्याच्या हजेरीतन सध्या काहीही साध्य होत नाहीय. त्याचा जबाब यापूर्वीच नोंदवून झालेला आहे. दर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 दरम्यान आर्यनच्या एनसीबी कार्यालयातील हजेरीमुळे पोलिसांवरही बंदोबस्ताचा ताण पडतोय असं आर्यनच्यावतीनं जेष्ठ वकील अमित देसाईंनी हायकोर्टाला सांगितलं. एनसीबीच्यावतीनंही या अर्जाला विरोध करण्यात आला नाही.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी 28 ऑक्टोबर रोजी कठोर अटीशर्तींसह या तिघींना जामीन मंजूर केला. त्यातील एका अटीनुसार, आर्यनला एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हजेरी लावणं बंधनकारक आहे. प्रामुख्यानं त्या अटीमध्ये शिथिलता आणण्याची मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली होता.
सदर प्रकरणाचा तपास हा आता एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता आर्यनच्या एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयातील हजेरीत शिथिलता आणावी. तसेच दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जाताना कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमं मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्यानं पोलीस आरोपींवर अरेरावी करत असल्याचा दावाही आर्याननं या अर्जातून केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीत शिथिलता आणण्याची मागणी या अर्जातून करण्यात आली होती.