'तारीख पे तारीख'... आर्यन खानला जामीन मिळणार की कारागृहातील मुक्काम वाढणार? आज फैसला!
Mumbai Cruise Drug Case : Aryan Khan : आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी. आर्यनची कालची रात्रही तुरुंगातच गेली.
Aryan Khan bail hearing : आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार असून त्याची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आर्यनच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आजची (गुरुवार) तारीख दिली आहे. आज दुपारी अडिच वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Highcourt) सुनावणी केली जाणार आहे. अशातच आज तरी आर्यनला जामीन मंजूर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पार पडली. बुधवारी या प्रकरणी आर्यनसह मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतलेल्या त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि या प्रकरणातील सहआरोपी मुनमुन धमेचा यांच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. आर्यनचे वकील अमित देसाई आणि मुकूल रोहतगी यांनी कोर्टात आपली बाजू मांडली. आता गुरुवारी तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्यानं एनसीबी आपली बाजू मांडणार असून त्यांनतर न्यायालय काय निर्णय देतं त्यावर आर्यनचं भवितव्य ठरणार आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवरून ड्रग्स एनसीबीकडून जप्त करण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचा यांच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. आर्यनसह हे दोघेही गेल्या तीन आठवड्यांपासून आर्थर रोड कारागृहात कैद आहेत.
अरबाझ मर्चंटविरोधात बजावण्यात आलेल्या मेमोमध्ये केवळ अंमली पदार्थ सेवनाचे आरोप असून एनडीपीएस कलम 29 अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा हा नंतर जोडण्यात आल्याची माहिती मर्चंटच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला दिली. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 (अ) नुसार संबंधित पोलीस अधिकारी आरोपीला अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याची नोटीस बजावतो. जर त्या व्यक्तीने नोटीशीचं पालन केलं नाही तर पोलीस पुढील निर्णय घेऊ शकतात, मात्र इथं थेट अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, आज (गुरूवारी) एनसीबीच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे बाजू मांडणार आहेत. एनसीबी मुंबई सत्र न्यायालयातील आरल्या दाव्यावर हायकोर्टातही ठाम असून या तिघांच्याही जामीनाला ते विरोध करणार आहेत. त्यानंतर न्यायालय गुरुवारीच यावर निर्णय देणार की, निकाल राखून ठेवत, तो कधी जाहीर करणार याचं उत्तर मिळेल, ज्यावर आर्यन खानचं भवितव्य ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :