'संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक न केल्यास वरळी पोलीस स्थानकाबाहेर धरणे आंदोलन'; मनसेचा सरकारला इशारा
Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी जवळपास 48 तास उलटूनही मुख्य आरोपी मिहीर शहा फरार असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Worli Hit And Run मुंबई: मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात (Worli Hit And Run) बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना 7 जुलैला घडली. यामध्ये शिंदे गटातील उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा (Mihir Shah) ही गाडी चालवत असल्याचं पुढे आलं. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर शहा फरार आहे. मिहीर शहाच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 11 पथके स्थापन केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखाही मिहीरचा शोध घेत आहे. आरोपी परदेशात पळण्याची शक्यता लक्षात घेता, सोमावरी मिहीर शहाविरोधात लूक आऊट नोटीसही जाहीर करण्यात आली आहे.
जवळपास 48 तास उलटूनही मुख्य आरोपी मिहीर शहा फरार असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वरळी येथील झालेल्या हिट अँड रन घटनेला 48 तास उलटून गेले आहेत. पण अजूनही मुख्य आरोपी मिहीर शहा फरार आहे. आज संध्याकाळपर्यंत जर आरोपीला अटक झाली नाही, तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.
वरळी येथील झालेल्या हिट अँड रन घटनेला 48 तास उलटून गेले आहेत पण अजूनही मुख्य आरोपी मिहीर शहा फरारी आहे.आज संध्याकाळपर्यंत जर आरोपीला अटक झाली नाही तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 9, 2024
राजेश शहा यांना जामीन मंजूर-
सदर प्रकरणामधील आरोपी महीर शहाचे वडील राजेश शहा यांना सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अपघातानंतर मिहीरने घटनास्थळावरुन पळ काढल्यानंतर राजेश शहा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यानं न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सोमवारी या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला.
अपघात कसा झाला?
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं.