Mumbai News : अंगावर कंबल टाकून सर्व आजार दूर करत असल्याचा दावा, 'त्या' भोंदूबाबावर कारवाईची अंनिसची मागणी
Kambal Wale Baba News : कंबलवाले बाबा विकलांग रुग्णांच्या अंगावर रग किंवा घोंगडी टाकून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
घाटकोपर : सध्या मुंबईत (Mumbai) चर्चा आहे ती, कंबलवाल्या बाबाची... कंबलवाले बाबा (Kambal Wale Baba) विकलांग रुग्णांच्या अंगावर रग किंवा घोंगडी टाकून त्यांच्यावर उपचार करुन त्यांना ठणठणीत बरं करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजप नेते राम कदम स्वत: या बाबाचा प्रचार करत आहे. घाटकोपरमध्ये मागील चार दिवसांपासून कंबलवाल्या बाबाचं शिबीर चालू आहे. राम कदम (Ram Kadam) यांनी दही हांडीच्या कार्यक्रमात या बाबाच्या शिबिराबाबत घोषणा केली होती. त्यांच्या पत्नीला बाबाच्या उपचाराचा फायदा झाला म्हणून आपण या शिबिराचं आयोजन करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आमदार राम कदम यांनी या दोन दिवस कंबलवाले बाबाला घरी आणलं होतं आणि त्यांचा जोरदार प्रचार करुन मोठी गर्दी केली होती.
कंबलवाले बाबांवर अंनिसकडून कारवाईची मागणी
कंबलबाबा कंबल टाकून रुग्णांवर उपचार करत असल्याचे अनेक व्हिडीओ राम कदम यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. या भोंदू बाबावर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात येत आहे. 'राजस्थानमधून कंबलवाले बाबा नावाची एक व्यक्ती सध्या आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात आली असून या ठिकाणी विकलांग लोकांना बरे करण्याचा त्यांच्या वतीने दावा करण्यात येत आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू आहे, त्या कायद्यान्वये अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, आम्ही या निमित्ताने पोलिसांना ही कारवाई त्वरित करण्याची करण्याची मागणी' अनिंस सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.
हे बाबा अंधश्रद्धा पसरवत नाहीत : राम कदम
राम कदम यांनी कंबलवाल्या बाबाबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलं की, ''मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मी मानत नाही. मला आधी कळलं तेव्हा मला स्वतःला वाटलं होतं हे (बाबा) ढोंगी आहे. पण, मी स्वतः कंबलवाल्या बाबांच्या कॅम्पला गेलो. माझ्या आईवडील आणि मित्रांना घेऊन गेलो त्यांना आराम मिळाला. मग माझ्या लक्षात आले की, हे बाबा अंधश्रद्धा पसरवत नाहीत तर, त्यांना नसांची माहिती असल्याने जागच्या जागी रुग्णाला आराम मिळतो. वॉकर घेऊन आलेले माणूस चालत गेलेत, व्हील चेअरचा माणूस ते चालायला लावतात. मला वाटतं तुम्ही त्यांचे युट्युबचे व्हिडीओ बघा आणि अनुभव घ्या. जर अनुभव घेतल्यानंतर देखील तुम्हाला वाटलं ही अंधश्रद्धा आहे तर, मग जरूर बोला. माहिती न घेता हे बोलणं योग्य नाही. माझ्या घाटकोपरमध्ये मागील पाच दिवसात हजारो लोकांना याचा फायदा झाला आहे.''
बाबावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा : विद्या चव्हाण
विद्या चव्हाण यांनी यावर टीका करत म्हटलं आहे की, ''राम कदम आणि कंबलवाले बाबा या दोघांवर तात्काळ जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा. हा तोच आमदार आहे ज्याने मुलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता याने त्या बाबाला आणलं आहे आणि तो महिलांना नको तिथं हात लावत आहे. हे गंभीर आहे. त्यामुळे विनयभंगाचा देखील गुन्हा व्हायला हवा. मी स्वतः घाटकोपर पोलीस ठाण्यात जाणार आहे आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आमदारावर गुन्हा दाखल करावा.''
गृह विभागाने यात लक्ष घालावा : रुपाली चाकणकर
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत गृह विभागाने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहीलं आहे की, 'अर्धांग वायू सारखे आजार ठिक करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबाला आपल्या मतदारसंघात आणून आमदार राम कदम हे शिबिराचे आयोजन करत असल्याचे सोशल मीडियातून समजले. एक बाबा अंगावर घोंगडी टाकून आजार बरा करतो अशा अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा मिळणे दुर्दैवी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने कठोर पावले उचलली पाहिजेत.'